शहरात विदेशी भाज्यांचेही भाव कडाडले | Loksatta

शहरात विदेशी भाज्यांचेही भाव कडाडले

एकीकडे देशी भाज्यांचे दर कडाडले असतानाच दुसरीकडे विदेशी भाज्यांचेही भाव गगनाला भिडले आहेत.

शहरात विदेशी भाज्यांचेही भाव कडाडले
विदेशी भाज्यांचेही भाव गगनाला भिडले आहेत

एकीकडे देशी भाज्यांचे दर कडाडले असतानाच दुसरीकडे विदेशी भाज्यांचेही भाव गगनाला भिडले आहेत. या भाज्यांची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली असून त्यामुळे त्यांची मागणी घटली आहे.

आयटी कंपनीत काम करणाऱ्या युवा पिढीची वाढती संख्या आणि जंकफूड, फास्टफूडसोबतच पंचतारांकित हॉटेलमध्ये तयार होणाऱ्या खाद्यपदार्थासाठी नागपुरात विदेशी भाज्यांची मागणी नेहमीच असते. त्यात विविध रंगाच्या ढोबळ्या मिरच्या, बेबीकॉर्न, स्वीट कॉर्न, ब्रोकली, मशरुम्स, जांभळी पत्ताकोबी, आइसबर्ग लेटयुस, चेरी टोमॅटो आदींचा समावेश आहे.

यासोबतच सालासकट खाता येण्याजोगे मटार (स्नो पीज्), एॅस्पॅरॅगस, आर्टीचोक, जालापेनो मिरच्या, झुकीनी (काकडी) या भाज्यांही नागपूरकरांमध्ये हळूहळू लोकप्रिय होत आहेत. सर्व विदेशी भाज्यांची किंमत पाव किलोला सुमारे पन्नास ते साठ रुपये आहे. स्नो पीजची किंमत दोनशे ग्रॅमला नव्वद रुपये आहे. विशेष म्हणजे, हॉटेल्स, रेस्टॉरेंटस् आणि शॉिपग मॉलमध्ये याची मागणी आहे, तर काही नागपूरकरही जेवणात काही बदल म्हणून विदेशी भाज्या खरेदी करतात.

या भाज्यांचा पुरवठा करणारे व्यापारी नागपुरात मोजकेच आहेत. ते बंगळुरू, दिल्ली येथून भाज्या मागवतात. या व्यवसायातील महिन्याच्या उलाढालीत ७५ टक्के वाटा हा हॉटेल व्यावसायिकांचा आहे. नागपुरात विदेशी भाज्यांची महिन्याला १५ लाखांची उलाढाल आहे. शहरात आयटीक्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. परदेशी राहिलेल्या मंडळींना या भाज्यांची चांगली ओळख झाली असल्याने त्यांच्याकडून भाज्यांना मोठी मागणी आहे. घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांबरोबरच संकेतस्थळावरूनही भाज्यांची विक्री केली जाते. पर्यटनाच्या हंगामात या भाज्यांची मागणी वाढते. ज्याप्रमाणात नागपुरात हॉटेल व्यवसाय वाढतो आहे त्याच प्रमाणात या भाज्यांची मागणीही वाढत आहे. सध्या या भाज्यांचे दर वाढले असून त्यामुळे मागणीतही घट झाली आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-08-2017 at 00:38 IST
Next Story
‘एमसीआय’च्या पत्राने डॉक्टरांना धडकी