वाघाच्या संवर्धन स्थलांतरणासाठी वनखात्याचे नियोजन

लिमये म्हणाले, ब्रम्हपुरीत सध्या ८० ते ९० वाघ आहेत. त्यातील ६० ते ६५ मोठे आणि २५ ते ३० बछडे आहेत.

प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांची माहिती; ‘लोकसत्ता’ला सदिच्छा भेट

नागपूर : वाघाच्या संवर्धन स्थलांतरणाचा प्रयत्न करावाच लागेल. तो अभ्यासपूर्ण व नियोजनबद्ध पद्धतीने केला तर नक्कीच त्यात यश येईल. त्यादृष्टीने वनखात्याचे नियोजन झाले असून पहिल्या टप्प्यात नागझिरा अभयारण्य, दुसऱ्या टप्प्यात नवेगाव अभयारण्य आणि तिसऱ्या टप्प्यात सह्यद्री व्याघ्रप्रकल्पात वाघांचे संवर्धन स्थलांतरण करण्यात येणार आहे. मानव-वन्यजीव संघर्षांवर वाघांच्या संवर्धन स्थलांतरणातून पर्याय शोधण्यासोबतच, वाघ कमी असणाऱ्या वनक्षेत्रात वाघांचा अधिवास निर्माण करून त्यांची संख्या वाढवण्यासाठी वनखाते काम करीत आहे, अशी माहिती राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी दिली. लोकसत्ताला दिलेल्या विशेष भेटीत एकूणच व्याघ्रसंवर्धनावर वनखात्याकडून सुरू असलेल्या विशेष प्रयत्नांबाबत त्यांनी सांगितले.

लिमये म्हणाले, ब्रम्हपुरीत सध्या ८० ते ९० वाघ आहेत. त्यातील ६० ते ६५ मोठे आणि २५ ते ३० बछडे आहेत. या वाघांवर देहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ लक्ष ठेवून आहेत. सारीस्काचे सर्व वाघ संपले होते तेव्हा संवर्धन स्थलांतरण करण्यात आले होते. बांधवगडला देखील वाघांचे संवर्धन स्थलांतरण करण्यात आले. त्याच धर्तीवर आता महाराष्ट्रात देखील ते करण्यात येत आहे. सारीस्का व बांधवगडमध्ये पूर्ण वाढ झालेले वाघ स्थलांतरित करण्यात आले होते, राज्यात आईवडिलांपासून नुकतेच वेगळे झालेले वाघ स्थलांतरित करण्यात येणार आहेत. कारण हे वाघ बाहेर पडतात तेव्हा ते स्वत:साठी अधिवास, खाद्य शोधतात. नागझिऱ्यात मादी वाघ कमी आहेत आणि याठिकाणी सोडण्यात येणाऱ्या मादी बछडय़ांना सहज अधिवास मिळू शकतो. साधारणत: एकाच वाघिणीपासून झालेले बछडे नेण्याचा प्रयत्न आहे. दुसऱ्या टप्प्यात नवेगाव अभयारण्यात वाघांचे संवर्धन स्थलांतरण करण्यात येईल. त्यासाठी या अभयारण्यात वाघांना आवश्यक खाद्य उपलब्ध करून देण्यासह त्यांचा अधिवास विकसित करण्यात येणार आहे. त्यानंतरचे स्थलांतरण हे नवेगावचे राहील. तिसऱ्या टप्प्यात सह्यद्री वाघ्रप्रकल्पात वाघांचे संवर्धन स्थलांतरण करण्यात येईल. या व्याघ्रप्रकल्पात स्थलांतरण हे आव्हान आहे. भारतीय वन्यजीव संस्थेच्या शास्त्रज्ञांनी त्याबाबत तांत्रिक बाबी समोर केल्या आहेत. मध्य भारतातले वाघ त्याठिकाणी स्थिरावणार नाहीत, अशी शंका आहे. मात्र, मध्य भारतातले वाघ भारताच्या कानाकोपऱ्यात स्थिरावले आहेत. त्यामुळे हा प्रयत्न करण्यास काहीही हरकत नाही. फारफार तर अपयश येईल, पण प्रयत्न केल्याशिवाय कळणार नाही. त्यासाठी देखील योजना तयार आहे. कात्रज आणि सागरेश्वर येथील प्राणिसंग्रहालयातील चितळ चांदोलीत १६ एकरावरील खुल्या पिंजऱ्यात सोडण्यात येतील. सुमारे वर्षभरानंतर तेथील चितळ आणि सांबरांची संख्या वाढली की अतिरिक्त चितळ आणि सांबर सह्यद्रीच्या जंगलात सोडण्यात येतील. याठिकाणी नर आणि मादी वाघाचे संवर्धन स्थलांतरण केले जाणार आहे. या क्षेत्रातील वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, कर्नाटकातून वाघ आणून सोडा, पण असे सहजासहजी वाघ कोण देणार? आपल्याकडेच वाघांची संख्या मोठी आहे आणि नियोजनबद्ध पद्धतीने संवर्धन स्थलांतरण केले, तर यश नक्कीच येईल, असा विश्वास लिमये यांनी व्यक्त केला.

हत्ती हाताळण्यासाठी तज्ज्ञांची मदत

गडचिरोली जिल्ह्यत ओरिसातून छत्तीसगडमार्गे हत्ती आले आहेत. कधीकाळी या जिल्ह्यत हत्तीचा अधिवास होता. त्यामुळे हत्ती आणि मानव संघर्ष कसा टाळता येईल, या हत्तीचे व्यवस्थापन कसे करता येईल, त्यासाठी स्वामीनाथन, सेनगुप्ता यासारख्या तज्ज्ञांची मदत घेण्यात येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Forest department planning for tiger conservation migration says sunil limaye zws

ताज्या बातम्या