वर्धा : उन्हाची काहिली वाढत असून अद्याप कथित नवतपा येणे बाकीच आहे. अशा स्थितीत मनुष्यप्रणी हवालदिल झाल्याची स्थिती असतानाच अरण्य प्रदेशात प्राण्यांची स्थिती अधिकच बिकट झाली असल्याचे चित्र आहे. म्हणून कृत्रिम व नैसर्गिक पाणवठे तहान भागविण्यासाठी वन विभागाने तयार केलेत. पण आता त्यापुढील टप्पा म्हणून चंद्रकोरी तलाव स्थापन करण्याचे ठरले आहे. आर्वी व कारंजा तालुक्यातील चार वन क्षेत्रात हे तळे तयार होणार. एका तळ्यासाठी २० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. किमान दोन हेक्टर आकारमान असलेल्या तळ्याच्या निर्मितीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले असल्याचे वन अधिकारी जाधव यांनी सांगितले.

या क्षेत्रात २५ ते ५० हेक्टर परिसरात पाण्याचा स्रोत तयार होणार. धमकुंड परिसरात दोन तर खैरवडा भागात दोन चंद्रकोरी तळे निर्माण करण्याचा उद्देश असल्याचे खात्याने स्पष्ट केले. हे तळे तयार झाल्यानंतर वन्यप्राण्यांची भटकंती थांबणार असल्याचा दावा वन खाते करीत आहे. पण हे काम सध्या खोळंबले आहे. कारण आचारसंहिता असल्याने प्रस्ताव स्थगित असल्याचे अधिकारी सांगतात. या चंद्रकोरी तळ्याची प्रतिकृतीही अद्याप तयार झालेली नाही. पण प्रस्ताव दिला असल्याचे खात्याकडून कळले.

हेही वाचा…जलसंकटाची चाहूल; मोठ्या, मध्यम धरणात पाच टक्के जलस्तर खालावला

बोर व लगत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बिबट तसेच वाघ व अन्य हिंस्त्र पशुंचा वावर आहे. आता तप्त उन्ह असल्याने हे प्राणी लागतच्या खेड्यात धाव घेऊ लागतात. मनुष्य व वन्यप्राणी यातील संघर्ष थांबला पाहिजे म्हणून हा चंद्रकोरी तळे प्रस्ताव एक पथदर्शी उपक्रम म्हणून पुरुस्कृत झाला आहे. विस्तीर्ण परिसरातील हे तळे तहान भागविणार आणि जमिनीत पाणी पण झिरपणार, असे म्हटल्या जाते. पण प्रस्ताव अद्याप मार्गी लागलेला नाहीच. जिल्हाधिकारी म्हणतात असे काही प्रस्ताव आलेच नाहीत. पण संबंधित यंत्रणेकडून तपासावे लागतील.

हेही वाचा…कुतूहल…‘या’ दिवशी सूर्य-चंद्राच्या मध्ये येणार पृथ्वी, जाणून घ्या सविस्तर

या जंगलांत काही गावांचे पुनर्वसन अद्याप बाकी आहे. त्यामुळे वाघ व बिबट्यांचे हल्ले नेहमी होत असतात. शिवाय रानटी मांजर, अस्वल, नीलगाय, कोल्हे, चितळ, रानडुक्कर पिकांचा फडशा पाडतात. यामुळे स्थानिक आदिवासी व अन्य शेतकरी हैराण झाले असल्याची ओरड होते. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी आचारसंहिता आहे म्हणून चंद्रकोरी तलाव प्रस्ताव रखडले, ही बाब तपासून पाहतो, असे उत्तर दिले. पण मुक्या पशुंचा व्याकुळपणा कसा संपणार, हे अनुत्तरीतच आहे.