चंद्रपूर : ब्रम्हपुरी वन परिक्षेत्रात धुमाकूळ घालत चार जणांचे बळी घेणाऱ्या टी १०३ एसएएम – १ या (नर) वाघाला गुरुवारी सकाळी जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले.

ब्रम्हपुरी वनविभागातील उत्तर ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रांतर्गत ब्रम्हपुरी उपक्षेत्रात शेतशिवार आणि मानवी वस्तीत संचार करणाऱ्या या वाघाने  २८ जून, १६ व १७ ऑगस्ट रोजी तिघांचे बळी घेतले. त्यापूर्वी याच वाघाने एकाला ठार केले होते, असे सांगितले जाते. यामुळे ग्रामस्थांमध्ये  तिव्र असंतोष होता. या पार्श्वभूमीवर वनविभागाने परिसरात बंदोबस्त लावला आणि गस्त वाढवून वाघाच्या हालचालीचे संनियंत्रण करण्यात आले. आज टी १०३ एसएएम – १ वाघ शेतशिवार परिसरात भ्रमण करित असल्याचे निदर्शनास आले. 

हेही वाचा >>> चंद्रपूर : ब्रम्हपुरीत वाघांचा उच्छाद; आठवडाभरात घेतले चार बळी , अड्याळ शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

यानंतर उत्तर ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रांतर्गत ब्रम्हपुरी उपक्षेत्र / भगवानपूर नियतक्षेत्रामध्ये (कक्ष क्र. ८९०) पशुवैद्यकिय अधिकारी (वन्यजीव), आरआरटी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर  डॉ. रविकांत खोब्रागडे व अजय मराठे, सशस्त्र पोलीस यांनी आज सकाळी ६.४५ वाजता टी १०३ एसएएम – १ वाघास अचूक निशाना साधून बेशुध्द केले. यानंतर त्यास पिंज-यात सुखरूपरित्या बंदिस्त करण्यात आले. ही कार्यवाही दिपेश मल्होत्रा, उपवनसंरक्षक, ब्रम्हपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली एम. बी. चोपडे, सहायक वनसंरक्षक (प्रा. व वन्य) ब्रम्हपुरी,  आर. डी. शेंडे, वनक्षेत्रपाल (प्रा.) उत्तर ब्रम्हपुरी, वनविभागाचे क्षेत्रिय अधिकारी / कर्मचारी, तसेच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूरचे सदस्य व  राकेश अहुजा (बायोलॉजिस्ट, ब्रम्हपुरी) यांचे उपस्थितीत पार पडली. जेरबंद करण्यात आलेल्या टी १०३ एसएएम – १(नर) वाघाचे वय अंदाजे दोन ते अडीच वर्षे असून  वैद्यकिय तपासणी केल्यानंतर त्याला ट्रांझिट ट्रिटमेंट सेंटर, चंद्रपूर येथे पुढील कार्यवाहीसाठी स्थलांतरित करण्यात येईल.