गोंदिया : देवरीतील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयासमोर गेल्या ३० मे पासून सुरू असलेले वनहक्क धारकांचे उपोषण आज मागे घेण्यात आले. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके आज बुधवारी उपोषणात सहभागी झाले. त्यांनी जिल्हाधिकारी आणि वनाधिकाऱ्यांना देवरीत बोलावून घेत वनहक्कधारकांसह चर्चा केली. या बैठकीत वनहक्कधारकांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्याने उपोषण मागे घेण्यात आले. ग्रामसभा वनहक्क कायद्यापासून वनवासीयांना वंचित ठेवणे, वनविभागाकडून अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वनवासींना वनविभागाकडून होणारा अन्याय या विरोधात वनहक्कधारक उपोषणाला बसले होते. माजी पालकमंत्री फुके, जिल्हाधिकारी आणि वनाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत वनहक्क दाव्यांच्या प्रलंबित प्रकरणांवर सकारात्मक चर्चा झाली. ग्रामसभा प्राधिकरणाकडून सुरू असलेल्या प्रक्रियेत वनविभाग कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. परंतु आगामी वनउत्पादन प्रक्रियेच्या अटींनुसार, सर्व योग्य कृती (सीएफआर, टीपी) इत्यादींवर चर्चा करून ही प्रक्रिया हंगामापूर्वी नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याबाबत सहमती दर्शवण्यात आली. हेही वाचा >>> चंद्रपूर रेंजजवळील जंगलात वाघिणीचा मृतदेह आढळला; मृत्यूमागील कारण काय? डॉ. परिणय फुके, जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, वनसंरक्षक कुलराज सिंग, जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत उपोषणकर्ते नारायण सलामे, गोपाल कोरेती, मडावी गुरुजी, चेतन उईके, राजू साहू, मोतीराम सायम, नेतराम हिडामी, जग सलामे, महारू भोंगाडे, बळीराम कुंभारे, संतोष भोयर, नूतन कोरे, जयराम कोरेती, खेमराज सलामे, धनुष जनबंधू, आदी सहभागी झाले होते. या बैठकीत वनहक्कधारकांच्या काही मागण्या मान्य झाल्या, इतर मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यामुळे वनहक्कधारकांनी उपोषण मागे घेतले, अशी माहिती सहायक वनसंरक्षक (तेंदू पाने) राजेंद्र सादगिर यांनी ‘लोकसत्ता’सोबत बोलताना दिली.