scorecardresearch

अकोला : खोटी स्वाक्षरी, पंचनाम्यात खोडखाड अन् शेतकऱ्यांची ३.९५ कोटींनी फसवणूक

जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. मुरलीधर इंगळे यांच्या तक्रारीवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले.

farmer 22
प्रतिनिधिक छायाचित्र/लोकसत्ता

अकोला : नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांचे कमी नुकसान दाखवून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी ‘आयआयसीआय लोंबार्ड’ विमा कंपनीच्या १० अधिकारी-कर्मचाऱ्यांवर खदान पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. मुरलीधर इंगळे यांच्या तक्रारीवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ३.९५ कोटींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

अकोला जिल्ह्यात खरीप हंगाम २०२२-२३ मध्ये ‘प्रधानमंत्री पीक विमा योजने’ची अंमलबजावणी करण्यासाठी ‘आयसीआयसीआय लोंबार्ड’ विमा कपंनीची नियुक्ती झाली. या कंपनीमार्फत जिल्ह्यात सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, कापूस आणि तूर आदी पिकांचा विमा शेतकऱ्यांनी काढला. दरम्यान, बार्शीटाकळी तालुक्यात नुकसान भरपाईचे एकाही शेतकऱ्यांचे सर्वेक्षण झाले नसल्याचे निदर्शनास आले. जिल्ह्यातील इतर तालुक्यातही हाच प्रकार असल्याचे आढळले.

हेही वाचा >>> राज्यात एक लाख ३९ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान, अब्दुल सत्तार यांच्याकडून नंदुरबार जिल्ह्यात पाहणी

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीच्या पंचनाम्यावरील क्षेत्र व नुकसानीची टक्केवारी यामध्ये देखील कंपनीकडून खाडाखोड करण्यात आल्याचे समोर आले. त्या अनुषंगाने अकोला जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून माहिती अहवाल बोलविण्यात आले. या अहवालानुसार ‘आयसीआयसीआय लोंबार्ड’ कंपनीचे जिल्हा व तालुका प्रतिनीधींनी शासनाची व शेतकऱ्यांची खोट्या पंचनाम्यांवर खाडाखोड करून नुकसानीचे क्षेत्र व टक्केवारी कमी केली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> जाती धर्माचे बंधन झुगारून पार पडला आदर्श  ‘सत्यशोधकी’ विवाह

अकोला तालुक्यात पडताळणी केलेल्या १२७ अर्जांवर खोट्या स्वाक्षरी आहेत. ४१ अर्जांवर नमूद केलेल्या बाधित क्षेत्रापेक्षा व नमुद नुकसानीच्या टक्केवारीपेक्षा कमी रक्कम अदा केली. विमा कंपनीने सर्वे अर्जाची संख्या १२ हजार ४५८ कळविले, तर १४ हजार ६०८  शेतकऱ्यांची ‘क्लेम पेड’ची यादी सादर केलेली आहे. बार्शीटाकळी तालुक्यात शेतकऱ्यांच्या नावानुसार छायांकीत प्रती सादर केल्या नसल्यामुळे संकलित माहितीमध्ये नावे तपासता आली नाहीत. अशा प्रकारे जिल्ह्यातील सातही तालुक्यात फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी दाखल तक्रारीवरून प्रभास अरबाईन, कमलेश पाटील, निलेश सोनोने, योगेश घाटवट, प्रफुल्ल गव्हाने, महेश दांदळे, अमोल टाले, नरेद्र बहाकार, आशीष भिसे, विकास शिंदे या व्यवस्थापकांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 14:55 IST

संबंधित बातम्या