नागपूर : भूषण गवई सरन्यायाधीश असताना कॉलेजियममध्ये गुणवत्तेच्या आधारावर निवड होत नसल्याचा आरोप न्यायपालिकेतूनच करण्यात आला होता. या आरोपांवर गवईंनी शनिवारी स्पष्टीकरण दिले आणि त्यांना त्यांच्या कार्यकाळात कॉलेजियमने घेतलेल्या निर्णयांवर पश्चाताप नाही, असे सांगितले.

नेमका मुद्दा काय?

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील सेंट्रल हॉलच्या नूतनीकरणाचे तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भित्तीचित्राचे शनिवारी माजी सरन्यायाधीश गवईंच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी गवई बोलत होते. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अतुल चांदूरकर व श्री चंद्रशेखर, दिल्ली उच्च न्यायालयाचे न्या. नितीन सांबरे, मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यवाह मुख्य न्या. रवींद्र घुगे, नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्या. अनिल किलोर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मागील वर्षात नागपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे न्या. दीपांकर दत्ताने अप्रत्यक्षरित्या न्या.चांदूरकर यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कॉलेजियमध्ये गुणवत्तेच्या आधारावर निर्णय होत नसल्याचा आरोप केला होता. गवईंनी शनिवारी न्या.चांदूरकर यांच्या नियुक्तीचा बचाव केला. गवई म्हणाले,’ सरन्यायाधीश होताच झालेल्या पहिल्या बैठकीत न्या.चांदूरकर यांना सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्याचा कॉलेजियमने निर्णय घेतला. काही सहकार्यांनी यावर टीका केली, मात्र कॉलेजियममधील निर्णयांचा पश्चाताप नाही. न्या.चांदूरकर यांनी त्यांचा निर्णय योग्य होता हे सिद्ध करून दाखविले, असेही गवईंनी सांगितले.’

न्यायाधीशांचे पद केवळ खुर्ची नव्हे

मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यवाह मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी नागपूर खंडपीठाच्या इमारतीचे वर्णन ‘दगडात कोरलेली कविता असे केले. सेंट्रल हॉल हे या न्यायालयाचे ‘धडधडणारे हृदय’असल्याचे सांगत त्यांनी न्यायालयाने अनेक ऐतिहासिक निर्णयांचे साक्षीदार राहिल्याचे नमूद केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भित्तिचित्राकडे पाहताना प्रत्येक नागरिकाला लोकशाही मूल्यांची आठवण होईल, असे ते म्हणाले. न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा उल्लेख करताना, न्यायव्यवस्थेतील प्रत्येक व्यक्ती समाजसेवा आणि वंचित घटकांच्या न्यायासाठी कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

न्यायाधीशांचे पद हे केवळ खुर्ची नसून एक जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले. न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांनी काळानुरूप न्यायालयीन कक्षांमध्ये बदल झाले असून आधुनिकतेशी सुसंगत सुधारणा करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. अलीकडेच ‘लेडी जस्टिस’ च्या पुतळ्याचे उद्घाटन झाले असून त्यामुळे ‘दगडातील कविता’ ही संकल्पना अधिक अर्थपूर्ण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

प्रवेशद्वारावर संविधानाच्या मूल्याचे प्रतिबिंब

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वागतपर भाषणात न्या. अनिल किलोर यांनी सेंट्रल हॉल हा न्यायालयाचा मुख्य प्रवेशद्वार असल्याने त्यातून संविधानाच्या मूल्यांचे प्रतिबिंब उमटले पाहिजे, अशी भावना व्यक्त केली. भित्तिचित्र केवळ स्मरणासाठी नसून न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांची जाणीव करून देणारे असल्याचे त्यांनी नमूद केले. न्या. नितीन सांबरे यांनी राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्याचे कौतुक केले. इतक्या उल्लेखनीय स्वरूपात या वास्तूचे जतन व सुशोभीकरण करण्यात आले असून, न्यायालयाच्या इतिहासात या कामाची नोंद राहील, असे ते म्हणाले.