अमरावती : सर्वोच्च न्यायालयात एका प्रकरणाची सुनावणी सुरू असताना तेव्हाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या एका वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. मध्य प्रदेशातील खजुराहो येथील एका मंदिरात भगवान विष्णूच्या तुटलेल्या मुर्तीची दुरूस्ती आणि देखभाल करण्याची मागणी करणारी याचिका खंडपीठाने फेटाळून लावली होती. या याचिकेला ‘प्रसिद्धीसाठी दाखल केलेली याचिका’ असे म्हणत खंडपीठाने याचिकाकर्त्याला म्हटले होते की, जर तो भगवान विष्णूचा मोठा भक्त असेल, तर त्याने प्रार्थना करावी आणि थोडे ध्यान करावे. भूषण गवईंच्या या वक्तव्यावर हिंदूविरोधी म्हणून आक्षेप घेण्यात आला होता. वाद उफाळून आल्यानंतर आपण सर्व धर्मांचा आदर करतो, असे स्पष्टीकरण भूषण गवई यांनी दिले होते.
भूषण गवईंनी का काढली आठवण?
अमरावतीत रविवारी रात्री शिवपरिवाराच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना भूषण गवई यांनी या प्रसंगाची आठवण काढली. ते म्हणाले, कधी-कधी आपल्या वक्तव्यांमधून वेगळा अर्थ काढून माध्यमांमध्ये विपर्यास केला जातो. अशाच माझ्या एका वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. तो आता निवळला आहे. पण, त्याआधी जिभेवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी दिला होता. आपण तो कसोशीने पाळण्याचा प्रयत्न केला होता.
न्यायपालिकेतही भरपूर राजकारण
भूषण गवई म्हणाले, २०१२ मध्ये दिवंगत दादासाहेब गवई यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मी त्यावेळी नागपूर येथे कार्यरत होतो. न्यायाधीश म्हणून दहा-बारा वर्षे काम करून झाली होती. या कार्यक्रमाच्या वेळी आम्ही दहा-बारा लोक आपसात चर्चा करीत होतो. त्यावेळी माझ्या तोंडातून निघाले की, आमच्या न्यायपालिका क्षेत्रात जे राजकारण आहे, ते राजकारण्यांपेक्षाही जास्त आहे. काही अजूनही बोलून गेलो. त्यावेळी हर्षवर्धन देशमुख हळूच माझ्याकडे आले आणि कानात काहीतरी सांगितले. सर्व गोष्टी आता सांगता येणार नाहीत. पण, त्यातला मतितार्थ हाच होता की, आपल्याला पुढे जायचे आहे. थोडे जिभेवर नियंत्रण ठेवा. त्यांचा सल्ला मी पाळला.
कोण कोणत्या पक्षात कळत नाही
सध्याच्या राजकारणात तत्त्वनिष्ठा, ध्येयनिष्ठा आणि विचारनिष्ठा कमालीची कमी झाली आहे. मी जेव्हा दिल्लीत होतो, तेव्हा रोज महाराष्ट्रातील वृत्तपत्रे आवर्जून वाचायचो. कारण वृत्तपत्र वाचल्याशिवाय कोण कोणत्या पक्षात आहे, हे समजणेच कठीण झाले होते, अशा शब्दांत भूषण गवई यांनी सध्याच्या बदलत्या राजकीय संस्कृतीवर मार्मिक भाष्य केले.
