बुलढाणा : खामगावचे माजी आमदार काँग्रेस सोडण्याच्या दीर्घ चर्चेला अखेर त्यांनीच पूर्णविराम दिला आहे. खामगाव विधानसभा मतदारसंघांचे तब्बल तीनवेळा काँग्रेसचे आमदार राहिलेले ज्येष्ठ नेते दिलीपकुमार सानंदा यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सर्व पदांचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या गृह जिल्ह्यातच हादरा बसला आहे. येत्या १२ जून रोजी दिलीप कुमार सानंदा हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून हाताला घड्याळ बांधणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
मागील काही महिन्यांपासून सानंदा हे काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. ते कोणत्या पक्षात जाणार याबद्धल उत्सुकता होती. मध्यंतरी त्यांनी किमान दोनवेळा शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. अलीकडे बुलढाणा दौऱ्यावर आलेले शिंदे यांची त्यांनी आमदार गायकवाड यांच्या फार्म हाऊस वर भेट घेतली. मात्र संभाव्य सेना प्रवेश टळला. भाजप प्रामुख्याने खामगावचे आमदार आकाश फुंडकर यांचा कडवा विरोध असल्याने हे डावपेच फसले. मात्र काँग्रेस सोडण्याचा निर्धार पक्का असल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधला. एक महिन्यापूर्वी त्यांच्या ताब्यातील खामगाव बाजार समिती मधील काही संचालकानी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला. यामुळे ते लवकरच हातात घड्याळ बांधणार हे स्पष्ट झाले. स्वतः सानंदा यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलतांना यावर शिक्कामोर्तब केले. तसेच काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनाम्याच्या माहिती दिली.
मागील चार दशकांच्या राजकारणात सांनंदा यांनी क्रियाशील सदस्य ते तीनवेळा आमदार अशी मजल मारली. मतदारसंघात कोणतेही नेतृत्व निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली. खामगाव मतदारसंघात काँग्रेस म्हणजे सानंदा असे समीकरण तयार झाले. गेली चार दशके ते काँग्रेसच्या कार्यात सक्रिय होते. पक्षनिष्ठा राखून त्यांनी संघटन बळकट करण्यासाठी तन-मन-धनाने योगदान दिले होते. पक्षानेही त्यांना विविध जबाबदाऱ्या देऊन गौरवले होते, असे त्यांनी आपल्या राजीनाम्यात नमूद केले आहे. मात्र, गेल्या काही काळात पक्षातील अंतर्गत गटबाजी, दुर्लक्ष आणि अनुशासनहीनतेमुळे सानंदा नाराज होते. विशेषतः २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसमधील काही कार्यकर्त्यांनी पक्षविरोधी कारवाया करून भाजपच्या उमेदवाराला मदत केली. या व्यक्तींनाच २६ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या सद्भावना संकल्प सभेची जबाबदारी देण्यात आली. खामगाव शहर काँग्रेसच्या अध्यक्षा सरस्वती खासने यांनी या प्रकरणी नावानिशी तक्रार केली असतानाही वरिष्ठ नेतृत्वाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने सानंदा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला असून, तो तात्काळ स्वीकारावा, अशी विनंती त्यांनी आपल्या पत्रात केली आहे. राजीनामा दिला असून, त्यांनी अधिकृतपणे याची माहिती प्रसिद्धी माध्यमांना दिली. त्यांच्या पाठोपाठ खामगाव मतदारसंघातील अनेक काँग्रेस पदाधिकारी राजीनामा देणार असून मोठ्या संख्येतील कार्यकर्ते देखिल सानंदा यांच्या समवेत राहणार हे उघड आहे.