नागपूर : बहुजन समाज पक्षाचे माजी नगरसेवक नरेंद्र वालदे यांच्या मुलाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शांतनूची पत्नी व तिच्या नातेवाईकांच्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप करीत वालदे कुटुंबीयांनी मृतदेह पाचपावली पोलीस ठाण्यात आणला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत घातल्याने प्रकरण निवळले. ही घटना बुधवारी दुपारी घडली. शांतनू नरेंद्र वालदे (२६, म्हाडा कॉलनी, जरीपटका) असे मृत युवकाचे नाव आहे. शांतनूचा कृतिका गजभिये (रा. लष्करीबाग) हिच्याशी २०२१ मध्ये प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवस तो भाड्याने राहायला गेला. सुरुवातीचे दिवस आनंदात गेले. नंतर, पती-पत्नीत वाद वाढले. सततच्या वादाला कंटाळून कृतिका माहेरी निघून गेली. १८ सप्टेंबरला शांतनू पत्नीला भेटायला सासरी जरीपटक्यात गेला. यावेळी त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात शांतनूविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या घटनेमुळे शांतनू दुखावला होता. १९ सप्टेंबरच्या रात्री घरी असताना त्याच्या डोक्यात आत्महत्येचे विचार फिरत होते. त्याचे वडील नरेंद्र वालदे यांनी जरीपटका पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष बाकल यांना फोन करून पोलीस कर्मचारी पाठवण्याची विनंती केली. दोन पोलीस कर्मचारी पोहोचण्यापूर्वीच त्याने आत्महत्या केली. हेही वाचा - सायबर गुन्हेगारांकडून वरिष्ठ पोलीस अधिकारीच लक्ष्य! आतापर्यंत २१ आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांचे बनावट अकाऊंट हेही वाचा - नागपूर – औरंगाबाद महामार्गाने प्रवास करण्यापूर्वी ही बातमी वाचा… जरीपटका पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली. शांतनूचे पार्थिव थेट पाचपावली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. कृतिकाचे वडील रवी गजभिये यांनी अपमानास्पद वागणूक देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप शांतनूच्या कुटुंबीयांनी केला. रवी गजभिये यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली. ठाणेदार वैभव जाधव यांनी कुटुंबीयांची समजूत काढली आणि निवेदन स्वीकारले. कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर वालदे कुटुंबीय पार्थिव घेऊन गेले.