बुलढाणा : सुबोध सावजी म्हणजे जिल्ह्याच्या राजकीय इतिहासातील एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व, आले अंगावर तर घेतले शिंगावर या वृत्तीने राजकारण करणारा काँग्रेस नेता. मेहकर विधानसभा मतदारसंघातून तीनवेळा निवडून आलेले आमदार, राज्यमंत्री, अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास. ते राजकरणातून (सक्तीने ) निवृत्त झाले असले तरी ते विविध प्रश्नांवर भाष्य करतात. विद्यमान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आमदार सिद्धार्थ खरात यासंह अन्य नेत्यांना, पक्षांना ( अनाहुत ) सल्ले देतात, राष्ट्रीय व राज्य पातळीवरील मोठ्या घडामोडी वर व्हिडीओ द्वारे व्यक्त होत राहतात…

आता मुंडेचे कौतुक

सध्या चर्चेत असलेले अन्न औषध चे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या विषयी सावजी यांना प्रेम, आदर आहे. या प्रेमाच्या भरात त्यांनी थेट देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन वजा पत्र पाठवून मुंडे यांचा राष्ट्रपतीनी सन्मान करावा अशी मागणी केली आहे. महाराष्ट्रातील अत्यंत प्रामाणिक आणि धडाकेबाज सनदी अधिकारी, अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रपती सन्मान (पुरस्कार )देण्यात यावा अशी मागणी सावजी यांनी केली आहे.

ना जातीचे, ना ओळखीचे…

माजी राज्यमंत्री सावजी यांनी पत्रात म्हटले आहे की, तुकाराम मुंडे यांच्या अंदाजे २१ वर्षांच्या सेवेमध्ये तब्बल २४ वेळा बदल्या झाल्या आहेत. त्यांच्या या बदल्यांमागे कोणताही हलगर्जीपणा, कामातील अनियमितता, भ्रष्टाचार किंवा वरिष्ठांचा अवमान करणे अशी कारणे नसून, या संपूर्ण प्रकरणाची राष्ट्रपतींनी चौकशी करावी. मुंडे यांनी जिथे जिथे काम केले, तिथे अत्यंत इमानदारीने आणि भ्रष्टाचारमुक्त सेवा दिली आहे, असे सावजी यांनी आवर्जून नमूद केले.मी गेल्या ५० वर्षांत तीन वेळा आमदार आणि एक वेळा मंत्री राहिलो आहे.

या राजकीय कारकिर्दीत मला असा कर्तव्यदक्ष अधिकारी पहिल्यांदाच पाहायला मिळाला आहे. म्हणूनच मी स्वतःहून ही शिफारस करत आहे. “माझा कोणताही वैयक्तिक संबंध नाही, असे सुबोध सावजी यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. त्यांनी मला कधी पाहिलेले नाही आणि मीही त्यांना पाहिलेले नाही. मात्र कर्तबगार अधिकाऱ्याचा असा मानसन्मान झाल्यास देशात एक चांगला संदेश जाईल. असे त्यांनी नमूद केले.

गृहखात्यात नियुक्ती व्हावी

तुकाराम मुंढे सध्या ज्या अन्न व औषध प्रशासन विभागात कार्यरत आहेत, तिथे त्यांच्या नियुक्तीपूर्वी अवघ्या ४ ते ६ महिन्यांपूर्वी अधिकारी लाच घेताना पकडले गेले होते आणि त्याचे व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले होते. मात्र, मुंढे यांनी या विभागाचा कार्यभार सांभाळल्यापासून महाराष्ट्रातून भ्रष्टाचार निर्मूलन होऊ शकते, असा विश्वास जनतेमध्ये निर्माण झाला आहे. यासोबतच, भविष्यात जर तुकाराम मुंढे यांची अन्न व औषध प्रशासन विभागातून बदली झाली, तर त्यांची नियुक्ती महाराष्ट्राच्या गृह विभागात मोठ्या पदावर करण्यात यावी, अशीही मागणी सुबोध सावजी यांनी पत्राद्वारे केली आहे.