अमरावती : विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रकाश भारसाकळे हे भाजपचे आमदार असताना देखील माझ्या विरोधात त्यांनी प्रचार केला, व्हीडिओ प्रसारीत केले. खरे तर तेव्हाच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी करायला हवी होती. पण, त्यांच्यावर कारवाई झाली नाही, वरून शाबासकी दिली गेली, त्यामुळेच त्यांची महत्वाकांक्षा वाढली.
आपण काहीही करू शकतो, असा त्यांचा अविर्भाव आहे. पुर्वीच्या काळी राक्षस असायचे. त्याला देवाने एखादे वरदान दिले, तो इतका विध्वंस करायचा, की देवांनाच अडचणीत आणायचा. तशीच प्रकाश भारसाकळे यांची प्रवृत्ती आहे. त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी केली आहे.
अभिजीत अडसूळ म्हणाले, दर्यापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत जनतेने त्यांना प्रत्युत्तर दिले. त्यांच्या पत्नी नलिनी भारसाकळे यांना केवळ साडेचार हजार मते मिळाली आणि त्या तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हे साडेसहा हजार मतांनी दुसऱ्या क्रमांकावर आले.
दर्यापूरमध्ये पराभव झाला म्हणून अकोटमध्ये कुठल्याही परिस्थितीत सत्ता आणायची, ही राक्षसी महत्वाकांक्षा प्रकाश भारसाकळे यांची आहे, म्हणून त्यांनी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदुत्ववादी विचारांना तिलांजली दिली. अकोटमध्ये एमआयएमसोबत युती केली. अशा राक्षसी महत्वाकांक्षा असणाऱ्या आमदाराची पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे.
नवनीत राणा यांच्यावरही टीका
अभिजीत अडसूळ यांनी भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, नवनीत राणा या अमरावतीत काही ठिकाणी युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करीत आहेत. असाच प्रकार माझ्या बाबतीत घडला होता. आम्ही महायुतीत असताना युतीधर्म मोडीत काढून माझ्या विरोधात युवा स्वाभिमान पक्षाने उमेदवार उभा केला होता. त्या ठिकाणी भाजपचे नेते प्रचारासाठी जात होते. चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी परिस्थितीत झाली होती. तीच स्थिती अमरावतीत भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची झाली आहे.
आमच्याशी जेव्हा काही कार्यकर्ते बोलतात, तेव्हा ते रडतात. पक्षासोबत निष्ठावान राहूनही आमच्या विरोधात प्रचार केला जातो, मग उमेदवारीच दिली कशाला, असा त्यांचा सवाल आहे. अन्याय झाल्याची भावना त्यांच्या मनामध्ये आहे. अभिजीत अडसूळ म्हणाले, अमरावतीत राजकारणाचा चिखल झाला आहे. भाजपने यावर लवकरच निर्णय घेण्याची गरज आहे. हे प्रकार झाले नसते, तर भाजप आणि शिवसेनेची अमरावतीत चांगली युती झाली असती. अधर्म होणार असेल, तर आम्ही युती करणार नाही, हे आम्ही सुरूवातीलाच सांगितले होते.
