चंद्रपूर : राजुराचे माजी आमदार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. प्रभाकरराव मामुलकर यांच्या पत्नी सुमनताई प्रभाकरराव मामुलकर यांनी आपली सुमारे पाच कोटी रुपयांची मालमत्ता फसवणुकीने परस्परांच्या नावावर करून घेतल्याचा आरोप सख्या बहिणीचा मुलगा अभिजित भुते, शिल्पा भुते, आशिष नलगे, बबन भुते आणि धनराज चिंचोलकर या पाच जणांवर केला आहे. या प्रकरणी त्यांनी राजुरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असल्याची माहिती पत्रपरिषदेत दिली. दरम्यान या फसवणुकीच्या प्रकरणाची पोलीसांनी चौकशी सुरू केली आहे.
सख्या बहिणीच्या मुलासह पाच जणांविरुद्ध तक्रार
सुमनताई मामुलकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, पतीच्या निधनानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी मदतीसाठी आपल्या सख्या बहिणीचा मुलगा अभिजित भुते व त्यांची पत्नी शिल्पा भुते यांना राजुरा येथील घरी राहण्यास ठेवले होते. त्यानंतर त्यांनी घरातील आर्थिक व अन्य व्यवहारांची जबाबदारी स्वतःकडे घेतली. पेन्शनची रक्कमही तेच काढत असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
मालमत्ता विक्रीपत्र व बक्षीस पत्रे केली
तक्रारीनुसार, २३ मे २०२५ रोजी ‘जमीन खरेदीसाठी कागदपत्रांवर स्वाक्षरी करायची आहे’ असे सांगून त्यांना राजुरा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात नेण्यात आले. तेथे आशिष नलगे, बबन भुते आणि धनराज चिंचोलकर उपस्थित होते. त्याच दिवशी विविध मालमत्तांबाबत विक्रीपत्रे आणि बक्षीसपत्रे करून घेण्यात आली. राजुरा व सुबई येथील घरे तसेच अंतरगाव आणि सुबई येथील शेतजमिनी संबंधितांच्या नावावर हस्तांतरित करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या सर्व मालमत्तेची किंमत सुमारे पाच कोटी रुपये असल्याचा दावा करण्यात आला आहे. आपले वय ८४ वर्षे असून प्रकृती ठीक नसल्याचा गैरफायदा घेत फसवणूक करण्यात आल्याचा आरोपही सुमनताई मामुलकर यांनी केला आहे. दोन महिन्यांपूर्वी आपल्याला घराबाहेर काढण्यात आले असून त्यानंतर त्या चंद्रपूर येथे भाऊ रविकांत निंबाळकर यांच्याकडे राहत आहेत. कागदपत्रांच्या सत्यप्रती मिळवल्यानंतर मालमत्ता हस्तांतरणाची बाब निदर्शनास आल्याचा त्यांचा दावा आहे.
राजुरा पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार
यानंतर २८ जून रोजी त्यांनी राजुरा पोलीस ठाण्यात अभिजित भुते, शिल्पा भुते, आशिष नलगे, बबन भुते आणि धनराज चिंचोलकर यांच्याविरुद्ध फसवणुकीची लेखी तक्रार दाखल केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी आणि मालमत्ता परत मिळवून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. पत्रकार परिषदेला रविकांत निंबाळकर, किरण निंबाळकर, सुनिता चाळके आणि मोहित निंबाळकर उपस्थित होते. दरम्यान, या प्रकरणी अभिजित भूते यांची भूमिका जाणून घेण्याकरिता त्यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.
