गडचिरोली : एकेकाळी दंडकारण्याच्या जंगलात पोलिसांसाठी डोकेदुखी ठरलेला, कोट्यवधींचे बक्षीस डोक्यावर असलेला आणि नक्षल चळवळीतील प्रभावी नेता म्हणून ओळखला जाणारा देवजी उर्फ तिप्पिरी तिरुपती पुन्हा एकदा वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. बंदुकीचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात परतलेल्या देवजीने तब्बल ४० वर्षांनंतर पुन्हा परीक्षा केंद्र गाठत १२ विच्या परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला असून, त्याच्या या प्रवासाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

दंडकारण्यात ‘रमेश अण्णा’ची दहशत

दंडकारण्य परिसरात ‘रमेश अण्णा’ या नावाने परिचित असलेला देवजी अनेक वर्षे नक्षल चळवळीतील महत्त्वाच्या पदावर सक्रिय होता. गडचिरोली, छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमावर्ती जंगलात त्याची दहशत होती. सुरक्षा यंत्रणांच्या नजरेत तो अत्यंत महत्त्वाचा नक्षलवादी नेता होता. त्याच्यावर मोठ्या रकमेचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते.मात्र, दीर्घकाळ जंगलातील जीवन जगल्यानंतर काही महिन्यांपूर्वी त्याने तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. बदलती परिस्थिती, वाढते वय आणि आरोग्याच्या समस्या यामुळे मुख्य प्रवाहात परतण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने सांगितले होते. आत्मसमर्पणानंतर आता त्याने नव्या आयुष्याची सुरुवात शिक्षणातून करण्याचे ठरविले आहे.

चार दशकांनंतर पुन्हा हाती पुस्तक

विशेष म्हणजे, १९८३ मध्ये शिक्षण अर्धवट सोडल्यानंतर देवजीने पुन्हा कधी पुस्तक हातात घेतले नव्हते. मात्र, चार दशकांनंतर त्याने पुन्हा अभ्यास सुरू करत उच्च माध्यमिक सार्वजनिक पुरवणी परीक्षेसाठी अर्ज केला. परीक्षा केंद्रात पोहोचलेल्या देवजीकडे अनेकांचे कुतूहलाने लक्ष लागले होते. जंगलातील चकमकी, बैठका आणि गुप्त हालचालींमध्ये आयुष्य गेलेल्या या व्यक्तीच्या हातात आता उत्तरपत्रिका आणि पेन दिसत होते.

बंदुकीकडून संविधानाच्या मार्गावर

देवजीने भविष्यात वकील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. समाजातील प्रश्न आता कायद्याच्या चौकटीत राहून मांडायचे आहेत, असे त्याने सांगितले. एकेकाळी बंदुकीच्या जोरावर व्यवस्था बदलण्याची भाषा करणारा हा माजी नक्षलवादी नेता आता शिक्षण आणि संविधानाच्या मार्गावर विश्वास ठेवताना दिसत आहे. त्यामुळे देवजीचा हा प्रवास केवळ एका व्यक्तीच्या आयुष्याचा बदल नसून, हिंसेकडून मुख्य प्रवाहाकडे वळलेल्या एका मानसिक परिवर्तनाची चर्चाही ठरत आहे.