scorecardresearch

फॉर्मुला वन पॉवरबोट आंतरराष्ट्रीय स्पर्धा मुंबईत

जगप्रसिद्ध फॉर्मुला वन पॉवरबोट आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेण्यासाठी राज्य सरकारने तयारी सुरू केली असून लवकरच ही स्पर्धा मुंबईत आयोजित केली जाणार आहे.

नागपूर : जगप्रसिद्ध फॉर्मुला वन पॉवरबोट आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेण्यासाठी राज्य सरकारने तयारी सुरू केली असून लवकरच ही स्पर्धा मुंबईत आयोजित केली जाणार आहे. यासाठी नौदलाचे सहकार्य घेण्यात येणार असून त्यासंदर्भात नौदलाच्या अधिकाऱ्यांशी बैठकही झाली आहे, अशी माहिती क्रीडामंत्री सुनील केदार यांनी लोकसत्ताला दिली.
पाण्यावरील थरार म्हणून ओळखली जाणारी ही स्पर्धा सिंगापूर आणि जगातील काही प्रमुख शहरांमध्ये होते. ती स्पर्धा मुंबईत झाली पाहिजे, यासाठी ही स्पर्धा घेण्यात येत आहे. त्यासंदर्भात नौदलाशी चर्चा झाली आहे. त्यांनी स्पर्धा घेण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. तरुणांमध्ये जलक्रीडेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच मुंबईला दक्षिण आशियातील प्रादेशिक पर्यटन केंद्र बनवण्यासोबतच पर्यटनाला चालना देण्यासाठी शहराच्या नयनरम्य वॉटरफ्रंटचा वापर करणे हे यामगचे उद्दिष्ट आहे. यापूर्वी २००४ ला मुंबईत अशा प्रकारची स्पर्धा झाली होती. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळासह राज्य सरकारने ही स्पर्धा आयोजित केली होती, असेही केदार यांनी सांगितले. दरम्यान, पुण्यातील क्रीडा विद्यापीठ आणि सैन्यदलाच्या दक्षिण कमानमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. त्यामुळे या विद्यापीठातील गुणवत्ता उच्च दर्जाची राहण्यास मदत होईल.
स्पर्धेचे स्वरूप ..
फॉर्मुला वन पॉवरबोट स्पर्धा ही अतिशय जलद अशा मोटार शर्यतीचा खेळ आहे. हा खेळ अधिकृतरित्या एफआयए फॉर्मुला वन आंतरराष्ट्रीय स्पर्धा या नावाने ओळखला जातो. साधारणत: ४५ मिनिटांची ही स्पर्धा असते. सरोवर, समुद्र, नदी इत्यादी ठिकाणी ही स्पर्धा आयोजित केली जाते. सिंगापूर येथील स्पर्धा जगप्रसिद्ध आहे.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Formula one powerboat international tournament mumbai international competition ysh

ताज्या बातम्या