पुढील वर्षी प्रदर्शनासाठी शुल्क आकारणार; ‘अ‍ॅग्रोव्हीजन’ कृषी प्रदर्शनाचा समारोप

नागपूर : अ‍ॅग्रोव्हीजन हे केवळ प्रदर्शन न राहता कायम स्वरूपातील उपक्रम व्हावे, यासाठी वर्धा मार्गावर रेडिसन ब्ल्यू हॉटेलजवळील चार एकर जमीन खरेदी केली जात आहे. येथे अ‍ॅग्रोव्हीजनचे कार्यालय आणि शेतकऱ्यांसाठी तात्पुरती बाजारपेठही उभारण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. अ‍ॅग्रोव्हीजन कृषी प्रदर्शनाचा सोमवारी समारोप झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. वर्धा मार्गावर चार एकर जागेत नियमित प्रदर्शन सुरू राहील. याशिवायही अ‍ॅग्रोव्हीजन ट्रस्टद्वारे कायमस्वरूपी जागा खरेदी केली जात आहे. तिथे वर्षभरम् शेतकऱ्यांचे प्रशिक्षण सुरू राहील. तेथे ट्रस्टचे कार्यालय राहील. सेंद्रिय शेती उत्पादनांना बाजारपेठही तिथे उपलब्ध करून दिली जाईल.

शेतकऱ्यांचा चांगला सहयोग या कार्यशाळांना मिळाला. हे पाहता अ‍ॅग्रोव्हीजन कृषी प्रदर्शन पुढील वर्षी आठ दिवसांच्या कालावधीची करण्याचा विचारही गडकरी यांनी व्यक्त केला. तसेच पुढील वर्षी सकाळी साडेदहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत प्रदर्शन बघण्यासाठी शुल्क आकारण्यात यायला हवे, असेही ते म्हणाले. ड्रोनच्या माध्यमातून फवारणी हे शेतकऱ्यांसाठी आता वरदान ठरले आहे, असे सांगताना गडकरी म्हणाले, विदर्भातच किमान दीड हजार ड्रोनची गरज पडणार आहे. ड्रोन चालवण्यासाठी प्रशिक्षित व्यक्ती लागतील. यामुळे ग्रामीण भागात ५० लाख बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल.  फुटाळाजवळील कृषी विद्यापीठाच्या जागेवर कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येणार आहे. १५० कोटींचा हा प्रकल्प आहे. देशात तो आदर्श मॉडेल बनेल, याकडेही गडकरी यांनी लक्ष वेधले. खासदार रामदास तडस यांनी शेती चांगला व्यवसाय असून नवनवीन प्रयोग मात्र आवश्यक असल्याचे सांगितले.

गडकरींना जॅकेट भेट

नैसर्गिक रंग वापरून तयार करण्यात आलेले जॅकेट यावेळी गडकरी यांना भेट देण्यात आले. यावेळी गडकरी म्हणाले, कुठल्याही प्रकराच्या रासायनिक रंगाचा वापर न करता रंगीत जॅकेट, कुर्ते, दुप्पटे तयार केले जाऊ शकतात, या जॅकेटवरून हे सिद्ध झाले आहे.

फ्लेक्स इंजिन वाहनांच्या उत्पादनांना मान्यता

पेट्रोलियम आयातीला पर्यायी इंधन म्हणून आणि देशातील शेतकऱ्यांना थेट फायदा मिळवून देण्यासाठी आता देशातील ऑटोमोबाईल वाहने उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना फ्लेक्स इंजिन इंधन वाहने आणि फ्लेक्स इंधन मजबूत हायब्रिड इलेक्ट्रीक वाहनांचे उत्पादन सुरु करण्यास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे, असे  गडकरी यांनी सांगितले.

राणे समारोपाला अनुपस्थित

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे कृषी प्रदर्शनाच्या समारोपासाठी नागपुरात दुपारी पोहचले. त्यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली, प्रदर्शन बघितले. परंतु समारोपाच्या कार्यक्रमाला ते अनुपस्थित होते. त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने ते तातडीने नागपुरातून रवाना झाल्याची चर्चा होती. हा कार्यक्रमाची नियोजित वेळ दुपारी ४ ची होती. ती बदलून दुपारी दोन करण्यात आली. परंतु प्रत्यक्षात कार्यक्रम साडेचार वाजता सुरू झाला.