लोकसत्ता टीम

यवतमाळ : येथील बाबाजी दाते महिला बँकेतील २४२ कोटी रुपये थकबाकीदार सभासद कर्ज प्रकरणी बँकेच्या तत्कालीन सीईओंसह चौघांना एसआयटी पथकाने अटक केली. ही कारवाई आज, शुक्रवारी करण्यात आली. सुजाता महाजन, विलास महाजन, बँक अधिकारी वसंत मोर्लीकर आणि कर्जदार नवलकिशोर मालानी अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. शनिवारी या चौघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

शहरातील बाबाजी दाते महिला बँकेचा परवाना नोव्हेंबर २०२२ मध्ये ‘आरबीआयने’ रद्द केला. त्यानंतर बँकेवर जिल्हा उपनिबंधकांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली. दरम्यान अमरावती येथील सहकार विभागाच्या लेखापरीक्षकाकडे लेखापरीक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. १ एप्रिल २००६ ते दि. ३१ मार्च २०२१ या कालावधीत सर्व संचालक, अधिकारी व इतरांनी संगनमत करून २४२ कोटी ३१ लाख २१ हजार १९ रुपयांची फसवणूक केली असल्याचे त्यात आढळून आले.

आणखी वाचा-यवतमाळ : ट्रकची धडक , दुचाकी चाकाखाली…पण, चालकाने चक्क बोनेटला पकडून…

या प्रकरणी दि. १३ ऑगस्ट २०२४ रोजी अवधुतवाडी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन केले. त्यानंतर या तपास पथकाकडून आरोपींची शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी एसआयटी पथकाने बाबाजी दाते महिला बँकेतील तत्कालीन सीईओ सुजाता महाजन यांच्यासह चौघांना अटक केली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक कुमार चिंता याच्या मार्गदर्शनात एसआयटी प्रमुख म्हणून (आयपीएस) सहायक पोलीस अधीक्षक तथा दारव्हा उपविभागीय पोलीस अधिकारी चिलुमुला रजनीकांत, पोलीस निरीक्षक अरूण परदेशी, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, पोलीस उपनिरीक्षक किशोर खंडार आणि कर्मचारी मिलींद गोफणे करीत आहे.

आणखी वाचा-गोंदियाः ‘हे’पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोभनीय नाही,कॉग्रेसचे चेनीथल्ला म्हणतात,‘मुख्य न्यायाधीशांच्या घरी…’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्तुळात वावरणाऱ्यांची बँक अशी बाबाजी दाते महिला सहकारी बँकेची ख्याती आहे. मर्जीतील खातेदारांनी कर्ज उचल करून बँकेची तब्बल २४२ कोटी ३१ लाख २१ हजार १९ रूपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी बँकेचे तत्कालीन संचालक मंडळ, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक कर्मचारी, कर्जदार अशा २०६ जणांवर अपहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. सोबतच बँकेने नियुक्त केलेले आठ मूल्यांकनकार, बँकेच्या पॅनलवरील तीन लेखापरिक्षक यांच्यावरही लेखापरीक्षणातून जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

बाबाजी दाते महिला सहकारी बँकेत मर्जीतील सभासदांना कमी मूल्यांकन असणाऱ्या मालमतांचे वाढीव मूल्यांकन दाखवून कोट्यवधीचे कर्ज मंजूर करण्यात आले होते. बँकेचे तत्कालीन आणि विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ही कर्ज प्रकरणे मंजूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या बँकवर अखेर कारवाई सुरू झाल्याने बुडीत ठेवीदारांनी समाधान व्यक्त केले आहे.