चार डबे निकामी

अपघाग्रस्त दुरान्तो एक्सप्रेसचे चार डबे निकामी झाल्याने नागपूर-मुंबई रेल्वेमार्ग वाहतुकीसाठी बुधवारी मध्यरात्रीनंतर खुला केल्यावरही ही गाडी रुळावर यायला आणखी काही काळ लागणार आहे.

दुरान्तोचे डब्बे जर्मन बनावटीचे स्टेनलेस स्टिल आणि अ‍ॅल्युमिनियमचे असतात. आतील भाग अ‍ॅल्युमिनियमचा असतो. अपघात झाल्यास ते परस्परांवर चढत नाहीत. नागपूर-मुंबई दुरान्तो एक्सप्रेसला १८ डबे आहेत. त्यापैकी दोन एसएलआर आहेत. नागपूरकडून निघणारी आणि मुंबईकडून निघणारी असे ३६ डबे नागपूर विभागाकडे आहेत. यातील चार डब्यांची दुरुस्ती होण्यापलीकडे नुकसान झाले आहे. त्यामुळे बुधवारी रात्रीपर्यंत मुंबई मार्गावरील वाहतूक सुरू करून सेवाग्राम एक्सप्रेस सोडण्यात येणार असली तरी उद्या दुरान्तो धावेल किंवा नाही, हे ठामपणे सांगता येणार नसल्याचे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक बृजेशकुमार गुप्ता यांनी सांगितले. दुरान्तोचे डबे उपलब्ध करण्याचा विषय मुख्यालयाचा आहे. आम्ही आमची आवश्यकता मुख्यालयाला कळवली आहे, परंतु १८ ऐवजी १४ डब्यांची दुरान्तो चालवली जाणार नाही. एवढय़ा कमी डब्याची गाडी चालवणे आर्थिकदृष्टय़ा परवडणारे नाही, असेही ते म्हणाले.

वाहतूक पूर्ववत होण्यास तीन दिवस

दुरान्तो एक्स्प्रेसची १२० किमी प्रतितास गती आहे. घाटाच्या वळणावर थोडी गती कमी केली जाते. शिवाय इंजिन चालकाला नियंत्रण कक्षाकडून वेळोवेळी सूचना दिल्या जातात. मंगळवारच्या दुरान्तो अपघाताच्या घटनेत इंजिन चालकाने स्वत:हून आपात्कालीन ब्रेक लावला की, त्याला सूचना मिळाली होती, यासंदर्भातील माहिती अद्याप कळू शकली नाही. मान्सूनपूर्व देखभाल-दुरुस्तीमध्ये अपघाग्रस्त भागाचे निरीक्षण झाले होते. मुंबई आणि पसिरात गेल्या-पंधरा वर्षांतील सर्वाधिक मोठा पाऊस झाला. या नैसर्गिक आपत्तीमुळे हा अपघात झाला आहे. या मार्गावरील वाहतूक पूर्ववत येण्यासाठी आणखी दोन ते तीन दिवस लागतील, असेही गुप्ता म्हणाले.

दुरान्तो, विदर्भ रद्द

दुरान्तोच्या अपघातानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस आणि नागपूर-मुंबई दुरान्तो एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. गुरुवारी मुंबईहून निघणारी दुरान्तो एक्सप्रेस रद्द होण्याची शक्यता आहे. एलटीटी-पुरी एक्स्प्रेस गुरुवारी मुंबईहून सुटणार नाही. एलटीटी-कामाख्या एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आली. शालिमार-मुंबई शालिमार एक्स्प्रेस मुंबईला न जाता नागपूपर्यंत धावेल. येथून ही गाडी शालिमारकडे उद्या रवाना करण्यात येणार आहे. तसेच हावडा-मुंबई मेल बुधवारी नागपूपर्यंतच आली. येथून परत गेली.