नागपूर : इंडिगो एअरलाईन्सच्या गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या विस्कळीत सेवेमुळे नागपूरमध्ये होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर सावट निर्माण झाले आहे. देशांतर्गत उड्डाण सेवा देणाऱ्या या एअरलाईन्सच्या मुंबई-नागपूर आणि पुणे-नागपूर या महत्त्वाच्या मार्गांवरील उड्डाणांचे वारंवार रद्द होणे तसेच तासनतास विलंबामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहे. या विस्कळीत सेवेमुळे अधिवेशनात सहभागी होणारे मंत्री, आमदार, अधिकारी तसेच विविध कारणांसाठी नागपूरकडे येणारे सामान्य नागरिक यांच्यावर थेट परिणाम झाला आहे.

आज शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणावर मंत्री आणि आमदार नागपूरात दाखल होण्याचे नियोजन होते. अधिवेशन सोमवार, ८ डिसेंबरपासून सुरू होत असल्याने रविवारी उपराजधानीत पोहोचणे आवश्यक होते. मात्र, मुंबई आणि पुण्याहून येणारी अनेक उड्डाणे ऐनवेळी रद्द झाल्याने प्रवास नियोजन बिघडले. इतर अरलाईन्सच्या तिकिटांसाठी अचानक वाढलेल्या मागणीमुळे तातडीने तिकीट बुक करण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाली. मात्र, आसने मर्यादित असल्याने शिल्लक तिकिटांचे दर अनेकपटीने वाढले आणि प्रवाशांना आर्थिक फटका बसला.
इंडिगो ही देशातील सर्वांत मोठी देशांतर्गत विमानसेवा असल्याने तिच्या कामकाजात झालेल्या व्यत्ययाचा सर्वाधिक फटका हिवाळी अधिवेशनाच्या व्यवस्थापनाला बसण्याची भीती व्यक्त होत आहे. विधिमंडळ सचिवालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंत्री आणि सचिवालयातील अधिकारी वेळेत पोहोचतील असे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, इंडिगोच्या सेवेत निर्माण झालेल्या गोंधळामुळे प्रवासाचा खर्च निश्चितच वाढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याबाबत शिवसेनेचे (शिंदे) आमदार कृपाल तुमाने म्हणाले, मुंबई आणि पुण्याहून येणाऱ्या आमदारांना विमानसेवा विस्कळीत झाल्याचा मोठा फटका बसणार आहे. मात्र, इतर अनेक आमदार व मंत्री समृद्धी महामार्गाचा पर्याय स्वीकारून नागपूरात पोहोचतील आणि अधिवेशनात सहभागी होतील.

सुरक्षा आढावा बैठक रद्द

महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शनिवारी मुंबईहून इंडिगोच्या विमानाने नागपूरात येऊन अधिवेशनापूर्वीची सुरक्षा आढावा बैठक घेणार होते. मात्र, त्यांच्या विमानाचेही उड्डाणा ऐनवेळी रद्द झाल्याने ते नागपूरात पोहोचू शकले नाही. परिणामी, नियोजित सुरक्षा आढावा बैठक रद्द करावी लागली, अशी माहिती सूत्रांनी दिली.