अमरावती : भातकुली ते दर्यापूर मार्गावर सायत गावाजवळ दोन कार समोरासमोर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.
जुनेद खान (३५, रा. बडनेरा), मुकूंद काळे (५७, रा. यशोदानगर, अमरावती), गोपालसिंह राजपुरोहित (३०, रा. भातकुली), आणि प्रेम उर्फ प्रकाश बिष्णोई (३२, रा. भातकुली), अशी मृतांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आयटेन आणि होंडासिटी कार भरधाव वेगात असताना सायत गावाजवळ समोरासमोर धडकल्या. ही धडक इतकी जबर होती, की दोन्ही वाहनांचा समोरील भाग चक्काचूर झाला. अपघाताचा मोठा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्रीच्या वेळी या मार्गावर मोठी गर्दी जमली होती.
जुनेद आणि मुकूंद काळे एका कारमध्ये होते जुनेद हा कार चालवत होता, तर गोपालसिंह आणि प्रेम बिष्णोई हे दुसऱ्या कारमधून प्रवास करीत होते.
वाहनांचा अत्याधिक वेग कारणीभूत?
वाहनांचा वेग जास्त असल्याने चालकांचे नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जखमींना वाहनांमधून बाहेर काढण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागले. अपघात घडल्यानंतर गावकऱ्यांनी जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले. दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघात एक जण जखमी झाला असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
मृतांपैकी गोपाल राजपुरोहित आणि प्रेम बिष्णोई हे राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील रहिवासी होते. भातकुली येथे बिकानेर या नावाने मिठाई विक्रीचा व्यवसाय करीत होते. ते भातकुली येथेच वास्तव्याला होते. तर मुकूंद काळे यांचे साईनगर परिसरात गॅरेज असून जुनेद खान हा चालक म्हणून काम करीत होता.
घटनेची माहिती मिळताच भातकुलीचे ठाणेदार राजू राजूलवार यांच्यासह भातकुली आणि वलगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले. या अपघातामुळे भातकुली ते दर्यापूर मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी अतिवेगामुळे हा अपघात घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. भातकुली पोलीस तपास करीत आहेत.
दर्यापूर ते भातकुली मार्गावर यापुर्वीही अनेक अपघात घडले आहेत. या मार्गावर वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवले जावे, यासाठी उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

