जिल्ह्यतील सर्व जलाशयांत फक्त ३५ दिवस पुरेल एवढेच पाणी शिल्लक असल्याने शहरातील पाणी कपातीचे संकट चार महिने कायम राहणार असल्याचे संकेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी दिले.

तोतलाडोहमध्ये ५६ दशलक्ष घनमीटर तर नवेगाव खैरीला ३३ दशलक्ष घनमीटर (वापरण्यायोग्य) पाणी आहे. पिण्याच्या पाण्याची स्थिती अतिशय चिंताजनक आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी सर्व कामे बाजूला ठेवून पाणी टंचाईशी सामना करावा, असे निर्देश त्यांनी दिले. बावनकुळे यांनी बुधवारी महापालिका व जिल्हा परिषद व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. तोतलाडोह जलाशयात पाण्याची पातळी ३१८ मीटपर्यंत असेल तर पंपाद्वारे पाणी उचल करणे शक्य असते. पण आता पातळी ३१४ मीटपर्यंत आली आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता आहे. नवेगाव खैरीत मात्र ३३ दशलक्ष घनमीटर पाणी पिण्यायोग्य उपलब्ध असून ते शहराला पिण्यासाठी वापरण्यात येणार आहे. आतापर्यंत महापालिकेकडून  दररोज ६४० दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा केला जात असे.

एक दिवसाआड पुरवठय़ामुळे तलावातील पाण्याची पातळी १५ दिवसांत वाढण्याची शक्यता आहे. आवश्यकता भासल्यास मध्यप्रदेशातील चौराई जलाशयातून १०-१५ दशलक्ष घनमीटर पाणी घेण्याची तयारी बावनकुळे यांनी दर्शवली.

हॉटेल, बारमध्ये पाणी वापरावर बंधने

पिण्याशिवाय अन्य कारणांसाठी पाणी वापर होऊ  नये, यासाठी  महापालिका झोनस्तरावर दक्षता समित्या स्थापन करणार आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठय़ापैकी ३० टक्के पाणी व्यावसायिक वापरासाठी दिले जाते. त्यातही कपात करण्यात येणार आहे. हॉटेल, बारमालक यांच्या पाणीवापरावर बंधने येणार आहेत. याशिवाय पाण्याची गळती थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

रेनवॉटर हार्वेस्टिंग

महापालिका, जिल्हा परिषद, महावितरण, महानिर्मिती व एनएमआरडीएने रेनवॉटर हार्वेस्टिग बंधनकारक करावे, असे निर्देश बावनकुळे यांनी दिले. सर्व शासकीय इमारती, शहर हद्दीतील घरे, मोठय़ा इमारती, जिल्हा परिषदेने सर्व गावांमध्ये लोकांना रेनवॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक करावे. सर्व नगर परिषदांनी गावातील इमारतींना रेनवॉटर हार्वेस्टिंग असल्याशिवाय इमारतींचे आराखडे मंजूर करू नयेत असेही सूचित करण्यात आले.

वेकोलिचे पाणी वापरणार

वेस्टर्न कोल फिल्ड्सच्या कोळसा खाणीमध्ये मोठय़ा प्रमाणात पाणीसाठे आहेत. १५दिवसांत हे पाणी वापरण्याचे निर्देश देत हे पाणी जलवाहिन्यांव्दारे कसे आणता येईल, याचे नियोजन करून करण्याच्या सूचना बावनकुळे यांनी दिल्या.