बुलढाणा : समृद्धी महामार्गावर आज झालेल्या विचित्र अपघातात चार प्रवासी जखमी झाले. आज संध्याकाळी नागपूर कॉरिडॉरमध्ये दुसरबीड ते मेहकर दरम्यान दुर्घटना घडली.एमएच-०४-जीजीडी-२०१५ क्रमांकाच्या कारचे टायर फूटून चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहनातील चार जण जखमी झाले असून त्यांना मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये चालक आफरोज खान, इब्राहीम खान, वसीम आणि शेख रसूल या चौघांचा समावेश आहे. चौघेही छत्रपती संभाजीनगर येथून मेहकरकडे जात होते. या अपघातामध्ये चालक आफरोज खान हा गंभीर जखमी झाला आहे.
नागपूर कॉरिडॉरमध्ये चॅनल क्रमांक ३०३ मध्ये हा अपघात झाला. मागील टायर फुटल्याने कार चालकाचे नियंत्रण सुटून वाहन ‘साईड बॅरियर’ला धडकले. पोलिस उपनिरीक्षक गजानन उज्जोनकर व त्यांचे सहकारी यांनी जखमींना मेहकर येथे उपचारासाठी हलविले. अपघातग्रस्त वाहन बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली.