नागपूर: नागपूरसह जवळपासच्या जिल्ह्यातील दहा वर्षांखालील चार सिकलसेलग्रस्त (थॅलेसेमिया) मुलांना ‘एचआयव्ही’ची लागण झाली आहे. प्रत्येक पंधरा दिवसांनी रक्त देतांना दूषित रक्तामुळे ‘एचआयव्ही’ची बाधा झाल्याचा संशय मुलांच्या नातेवाईकांकडून व्यक्त केला जात आहे.
जास्त सिकलसेलग्रस्त आढळणाऱ्या भागात नागपूरसह मध्य भारताचाही क्रमांक वरचा आहे. या आजारातील थॅलेसेमियाग्रस्त मुलांना प्रत्येक पंधरा दिवसांनी रक्त द्यावे लागते. रक्त न दिल्यास या मुलांची प्रकृती खालवते. हे रक्त रक्तपेढय़ांनी रुग्णांना नि:शुल्क देण्याचा शासनाचा नियम आहे. त्यानुसार या रुग्णांना नि:शुल्क रक्तही मिळते. परंतु अनेकदा हे रक्त नॅट तपासणी केलेले नसते. त्यामुळे या रक्तामुळे काही रुग्णांना इतर गंभीर आजाराच्या संक्रमणाचा धोका वाढतो. परंतु या तपासणीसाठी १,२०० रुपयांचा खर्च येतो.
हा खर्च गरीब कुटुंबाला उचलणे शक्य नाही. त्यामुळे या तपासणीविना मिळनारे रक्तच दिले जाते. दूषित रक्त मिळाल्यानेच या मुलांना हा आजार झाल्याचा संशय आहे. या रुग्णांपैकी एकाचा मृत्यूही झाला आहे. चारपैकी एक मुलगी केवळ तीन वर्षांची असून तिला सात ते आठ महिन्यापूर्वी एचआयव्ही असल्याचे निदान झाले. ही सर्व बालके कामठी, हिंगणा व इतर भागातील आहेत. त्यातच थॅलेसेमियाच्या पाच मुलांना हिपेटायटीस सी आणि दोघांना हिपेटायटीस बी आजार झाल्याचेही निदर्शनात आले आहे. दरम्यान, या मुलांनी वेगवेगळय़ा रक्तपेढय़ांतून रक्त घेतले असल्याने कोणत्या रक्तपेढीतून हे रक्त दिले गेले, हे सांगणे कठीण आहे. या मुलांना एचआयव्ही झाल्याच्या वृत्ताला सिकलसेलच्या क्षेत्रात काम करणाऱ्या डॉ. विंकी रुघवाणी यांनी दुजोरा दिला. थॅलेसेमियाग्रस्त मुलांना नॅट तपासणी केलेले रक्त दिल्यास संक्रमनाचा धोका खूपच कमी होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘‘या प्रकरणाची अद्यापही आरोग्य विभागाकडे लेखी तक्रार नाही. परंतु एका संघटनेने लवकरच यादी देणार असल्याचे कळवले आहे. त्यानुसार वरिष्ठांना माहिती दिली आहे. यादी मिळाल्यावर वरिष्ठांच्या सूचनेनुसार तातडीने चौकशी व इतर कारवाई केली जाईल.’’

  • डॉ. रवी धकाते, सहाय्यक उपसंचालक (नागपूर विभाग), सार्वजनिक आरोग्य विभाग.