अमरावती : 'वीज बिल भरा, अन्यथा…'; धारणीतील वृद्धेची ४.८२ लाखांनी फसवणूक | Fraud of lakhs of elderly in Dharani mma 73 amy 95 | Loksatta

अमरावती : ‘वीज बिल भरा, अन्यथा…’; धारणीतील वृद्धेची ४.८२ लाखांनी फसवणूक

तुम्‍ही वीज बिल भरलेले नाही, तत्‍काळ ऑनलाईन बिल भरा, अन्‍यथा वीज पुरवठा खंडित करण्‍यात येईल, असे सांगत एका सायबर भामट्याने मेळघाटातील धारणी तालुक्‍यातील वृद्धेची फसवणूक केल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे.

light bill fraud
( संग्रहित छायचित्र )

तुम्‍ही वीज बिल भरलेले नाही, तत्‍काळ ऑनलाईन बिल भरा, अन्‍यथा वीज पुरवठा खंडित करण्‍यात येईल, असे सांगत एका सायबर भामट्याने मेळघाटातील धारणी तालुक्‍यातील वृद्धेची फसवणूक केल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

हेही वाचा >>>नागपूर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा

धारणीपासून जवळच असलेल्‍या दुणी येथील एका ६२ वर्षीय सेवानिवृत्‍त महिलेला गेल्‍या ३ फेब्रुवारीला दुपारी तीन वाजताच्‍या सुमारास अज्ञात आरोपीने मोबाईलवर संपर्क साधला. आपण पुणे येथील महावितरण कंपनीच्‍या कार्यालयातून बोलत असून थकित वीज बिल भरले नाही, तर वीज पुरवठा तत्‍काळ खंडित करण्‍यात येईल, असे सांगून या भामट्याने महिलेला बिल ऑनलाईन भरण्‍यास सांगितले. त्‍यावर आपल्‍याला ऑनलाईन पद्धतीने बिल भरता येत नाही, आपण केंद्रावर जाऊन नक्‍की बिल भरू, असे उत्‍तर या महिलेने दिले. पण, आरोपीने बिल तत्‍काळ भरणे गरजेचे आहे, असे सांगून या महिलेला महावितरण, टीम व्हिवर, क्विक सपोर्ट, एसएमएस फॉरवर्डर हे ॲप मोबाईलवर डाऊनलोड करण्‍यास सांगितले.आरोपीच्‍या म्‍हणण्‍यानुसार वृद्धेने हे ॲप डाऊनलोड केले आणि त्‍यांच्‍या स्‍टेट बँक ऑफ इंडियाच्‍या खात्‍याची माहिती दिली. त्‍यांच्‍या खात्‍यातून ४ लाख ८२ हजार ६४८ रुपये वळते झाल्‍याची माहिती त्‍यांना बँकेच्‍या खातेबूक विवरणातून कळली. फसवणूक झाल्‍याचे लक्षात येताच या महिलेने त्‍यांनी धारणी पोलीस ठाण्‍यात पोहचून तक्रार दाखल केली.

हेही वाचा >>>फडणवीस यांना नागपुरात ‘तोच’ अनुभव

ग्राहकांना वैयक्तिक मोबाइल नंबरवरून व्हाट्सॲप आणि एसएसएसद्वारे मागील महिन्याचे वीजदेयक अद्याप भरलेले नसल्यामुळे तुमचा वीजपुरवठा खंडित करण्यात येईल, त्यामुळे सोबत दिलेल्या वैयक्तिक फोन क्रमांकावर संपर्क साधावा असा बनावट मेसेज वीज ग्राहकांना पाठविण्यात येत आहेत. याद्वारे ग्राहकांची आर्थिक फसवणूक करण्याचा हा प्रकार पुन्हा सुरू झाला आहे. अनेक ग्राहकांनी या संदेशास प्रतिसाद दिला असून त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. दुसरीकडे, आता थेट मोबाईलवरून संपर्क साधून वीज पुरवठा खंडित करण्‍यात येईल, असे सांगितले जात आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 16:47 IST
Next Story
फडणवीस यांना नागपुरात ‘तोच’ अनुभव