|| महेश बोकडे

 अडीचपट जास्त शुल्काची वसुली ’ आरटीओ, शासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

नागपूर : महाराष्ट्रात करोनाचा उद्रेक झाल्यावर मध्यप्रदेश सरकारने मार्च २०२१ पासून महाराष्ट्रातील  सर्व प्रवासी बसवर प्रतिबंध घातले. परंतु,  खासगी ट्रॅव्हल्सकडून चोरट्या मार्गान अडीचपट जास्त प्रवासी शुल्क घेत आजही वाहतूक सुरू आहे.  प्रवाशांना एका राज्यातील बसमधून सीमेवर उतरवत दुसऱ्या राज्यात चारचाकी वाहनाने नेत दुसऱ्या बसमध्ये बसवून निश्चित ठिकाणी पोहचवले जाते. यावेळी प्रवाशांना होणाऱ्या त्रासाकडे दोन्ही राज्यांतील आरटीओ व शासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.

नागपूरसह विदर्भात करोनाचा प्रादुर्भाव खूप कमी झाला आहे. तरीही मध्यप्रदेश सरकार  महाराष्ट्रातील एसटीसह इतर खासगी प्रवासी बसला प्रवेश देण्यास तयार नाही. त्याचा फटका  सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. शिवनीहून नुकतेच नागपुरात आलेल्या एका तरुणीने नाव न टाकण्याच्या अटीवर हा धक्कादायक प्रसंग ‘लोकसत्ता’ला सांगितला. या तरुणीची नागपुरात  परीक्षा होती.  तिने शिवनीहून मुजाहित ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसचे  तिकीट घेतले. पूर्वी शिवनीहून नागपुरपर्यंत ट्रॅव्हल्सच्या तिकिटासाठी २०० रुपये लागत होते. यावेळी तब्बल ५०० रुपये घेतले गेले. ट्रॅव्हल्सचे नाव व प्रवासी शुल्काचा उल्लेख नसलेले तिकीट दिले गेले.   बसचा प्रवास शुक्रवारी दुपारी १२ वाजता सुरू झाला.

साधारणत: ही बस नागपूरपर्यंतचे १२७ किलोमिटरचे अंतर अडीच तासात पूर्ण करते. परंतु चोरट्या पद्धतीने प्रवास करतांना तिला नागपूरला यायला तब्बल सात तास लागले. शिवनीहून बस नागपूरला निघाल्यावर मध्यप्रदेशच्या सीमेवरील खवासापूर्वी एका ढाब्यावर थांबली. येथे सर्व ४५ प्रवाशांना  उतरवून तेथे  वेगवेगळ्या सात चारचाकी वाहनांत बसवून  महाराष्ट्र सीमेवरील एका ठिकाणी आणले गेले. येथे दुसऱ्या ट्रॅव्हल्समध्ये  बसवून बस नागपूरकडे निघाली. कामठी रोडवरील शारदा इस्पात लिमिटेडजवळ ही बस पोलिसांनी अडवली. बसमध्ये अनेक प्रवाशांच्या तोंडावर मुखपट्टी नसल्याने ट्रॅव्हल्सला दंड ठोठावला गेला. त्यानंतर ही बस फिरत- फिरत रिझर्व्ह  बँक चोकात आली. येथे  पोलिसांनी बसचे छायाचित्र काढले. त्यानंतर प्रवाशांना शहरातील  थांब्यावर टप्या- टप्याने सोडले गेले. या गोंधळात प्रवाशांना तब्बल सात तासांचा अवधी लागला. हा प्रकार दोन्ही राज्यातील सीमेवरील आरटीओ, स्थानिक पोलिसांसह अधिकाऱ्यांना दिसत असतांनाही ते गप्प असल्याचा संताप या तरुणीसह इतरही प्रवाशांनी व्यक्त केला.

नितीन गडकरींनी पुढाकार घेण्याची गरज

केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी  नागपुरचे आहेत. नागपुरातील प्रवाशांना मध्यप्रदेश- महाराष्ट्र दरम्यान प्रवास करतांना  निर्बंधाचा प्रचंड मनङ्मस्ताप होत आहे.  सध्या मध्यप्रदेशात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे गडकरी यांनी तातडीने तेथील सरकारशी बोलून हा प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.