अमरावती: शेती क्षेत्रापासून फोटोग्राफीपर्यंत विविध क्षेत्रांतील कामे अचूक आणि उत्तम पद्धतीने करण्यासाठी आज ड्रोनचा वापर केला जातो. हे ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागतात; मात्र राज्य शासनाच्या एका योजनेअंतर्गत हे प्रशिक्षण चक्क मोफत दिले जाते.

एवढेच नव्हे, तर प्रशिक्षणानंतर ड्रोन उडवण्याचा अधिकृत परवानाही दिला जातो. ही योजना अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे राबवली जात आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी अमृत संस्थेच्या जिल्हा कार्यालयाशी तातडीने संपर्क साधावा किंवा ऑनलाइन अर्ज भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नेमकी योजना काय?

अमृत म्हणजेच महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी, त्यांच्यातून उद्योजक घडवण्यासाठी ही संस्था विविध योजनांसह वेगवेगळ्या प्रकारचे उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमही राबवते. त्यामध्येच ड्रोन पायलट बनण्यासाठीच्या प्रशिक्षणाचाही समावेश आहे. त्यासाठी अमृत ड्रोन मिशन या नावाने मोहीम राबवली जाते. हा प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत दर्जेदार असून, एरव्ही ज्यासाठी किमान लाख-दीड लाख रुपये मोजावे लागतात, तो १० दिवसांचा निवासी कोर्स अमृत संस्थेकडून लक्ष्यित घटकांसाठी मोफत राबवला जातो.

करिअरच्या नव्या संधी

ड्रोन ऑपरेटर (पायलट) प्रशिक्षण कार्यक्रमामुळे युवकांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअरच्या नव्या संधी खुल्या होत आहेत. ड्रोनच्या वापराची क्षेत्रे आज विस्तारली असून, शेती फवारणी, पीक सर्वेक्षण, भूमापन (सर्व्हे), व्हिडिओग्राफी व फोटोग्राफी, सरकारी प्रकल्प निरीक्षण अशा अनेक क्षेत्रांमध्ये ड्रोनचा प्रभावी वापर केला जातो. त्यामुळे या क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. हे नेमके ओळखून अमृत संस्थेने ड्रोन मिशनची सुरुवात केली.

योजनेचा उद्देश काय?

महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवकांना, विशेषत: ग्रामीण क्षेत्रात स्वयंरोजगार व रोजगार निर्मिती करणारे प्रशिक्षण देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. मुख्यत्वेकरून शेती क्षेत्रातील वापर, जमिनीचे सर्वेक्षण, एरियल फोटोग्राफी, आपत्ती व्यवस्थापन या विषयांमधून प्रशिक्षणाचा विषय या कोर्समध्ये निवडता येतो. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय अर्थात ‘डीजीसीए’ची सुरक्षित उड्डाण नियमावली, तसेच आधुनिक ड्रोन हाताळणी, ड्रोनचा मेन्टेनन्स वगैरे बाबींचे प्रशिक्षणही या कोर्समध्ये दिले जाते. प्रात्यक्षिक ज्ञानावर भर हे या कोर्सचे वैशिष्ट्य आहे. कोर्स कालावधीतील १० दिवसांची राहण्या-जेवण्याची व्यवस्था आणि खर्चही अमृत संस्थाच करते.