अमरावती : येथील स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाने (सुपर स्पेशलिटी) जिल्ह्याच्या वैद्यकीय इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ‘व्हल्व्हर कॅन्सर’ या अत्यंत दुर्मिळ आणि गुंतागुंतीच्या मानल्या जाणाऱ्या कर्करोगावर दोन मोठ्या शस्त्रक्रिया येथे प्रथमच यशस्वीरीत्या पार पडल्या. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत या दोन्ही शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात आल्या, ज्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
‘व्हल्व्हर कॅन्सर’च्या शस्त्रक्रियेत केवळ ट्यूमर (गाठ) काढून चालत नाही. हा कर्करोग रक्तपुरवठा करणाऱ्या मुख्य रक्तवाहिन्यांजवळील लसिका ग्रंथींपर्यंत (लिम्फ नोड्स) पसरण्याचा धोका असतो. या ग्रंथी काढताना अति रक्तस्त्राव किंवा नसांना इजा होण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे ही शस्त्रक्रिया अत्यंत जोखमीची आणि उच्च कौशल्याची मानली जाते.
गेल्या आठवड्यात रुग्णालयात दोन ज्येष्ठ महिलांवर या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. पहिल्या प्रकरणात, मोर्शी (जि. अमरावती) येथील ६८ वर्षीय महिलेच्या ३ सेंमी आकाराचा ट्यूमर काढण्यात आला. दुसऱ्या प्रकरणात, कारंजा लाड (जि. वाशिम) येथील ७० वर्षीय महिलेच्या ४ सेंमी आकाराच्या ट्यूमरवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
रुग्णालयातील कर्करोगतज्ज्ञ डॉ. आयुष अजयकुमार हेडा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दोन्ही रुग्णांच्या ट्यूमरचे ‘रॅडिकल रिमूवल’ (मुळापासून उच्चाटन) केले. तसेच, खोलवरच्या सर्व संबंधित लसिका ग्रंथीदेखील सुरक्षितपणे काढण्यात आल्या. कोणतीही मोठी गुंतागुंत न होता या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या.
या यशाबद्दल वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे आणि विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांनी डॉक्टरांच्या पथकाचे कौतुक केले. शस्त्रक्रियेसाठी बधीरीकरण तज्ञ डॉ. सपना खेमुका, डॉ. सचिन गोंडाने व त्यांच्या सहकाऱ्यांसह, समाजसेवा अधीक्षक शीतल बोंडे, अधिसेविका चंदा खोडके आणि इन्चार्ज सिस्टर बिल्कीस शेख यांच्यासह संपूर्ण पथकाने मोलाचे सहकार्य केले.
अमरावतीमध्ये या प्रकारच्या प्रगत कर्करोग शस्त्रक्रिया प्रथमच झाल्या आहेत. आता संदर्भ सेवा रुग्णालयात स्त्रीरोगाशी संबंधित प्रगत कर्करोग शस्त्रक्रिया नियमितपणे उपलब्ध होणार असल्याने, जिल्हा व परिसरातील महिला रुग्णांची मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. ‘व्हल्व्हर कॅन्सर’ हा कर्करोगाचा एक प्रकार आहे जो स्त्री जननेंद्रियाच्या बाहेरील भागात व्हल्व्हामध्ये तयार होतो. हे प्रामुख्याने पोस्टमेनोपॉझल महिलांवर परिणाम करते परंतु कोणत्याही वयात होऊ शकते. व्हल्व्हा कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार म्हणजे स्क्वॅमस सेल कार्सिनोमा, जो व्हल्व्हाच्या अस्तर असलेल्या स्क्वॅमस पेशींपासून उद्भवतो. शल्यक्रिया ही व्हल्व्हर कर्करोगासाठी महत्वाची मानली जाते.
