Sanjay Rathod Pohradevi Tour: अकोला : राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला चक्क धुडकावून लावले. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशवर मोठे इंधन संकट कोसळले. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्र व राज्यांमधील सर्व मंत्री, नेत्यांसह जनतेलाही इंधन बचतीचे आवाहन केले. अनेक नेत्यांनी कृतीतून आवाहनाला प्रतिसाद दिला. राज्यातील मृद व जलसंधारण मंत्री तथा शिवसेना नेते संजय राठोड यांनी वाशीम जिल्ह्यातील दौऱ्यात पंतप्रधानांच्या आवाहनाला बगल दिली. यावेळी माजी खासदार विजय दर्डा त्यांच्यासोबत होते. मुंबई ते नागपूर विमान, तर नागपूर ते पोहरादेवी असा हेलिकॉप्टरमधून त्यांनी प्रवास केला. पोहरादेवी येथील वास्तू संग्रहालयाची पाहणी करण्यासाठी शासकीय ताफा घेऊन आले. ताफ्यात तब्बल २० पेक्षाअधिक गाड्यांचा लवाजमा होता. खासगी वाहने देखील १२ ते १५ असल्याने सर्वसामान्यांमधून जोरदार टीका होत आहे.

नेमकं घडलं काय?  

आखाती देशातील तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली. त्याचे परिणाम देशांतर्गत होऊन इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. इंधनासाठी नागरिकांना मोठ-मोठ्या रांगा लावाव्या लागत आहेत. देशांतर्गत इंधन संकट लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला बचतीचे आवाहन केले. मंत्री, नेत्यांनी आपल्या ताफ्यांमध्ये कपात करण्याच्या सूचना दिल्या. त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, राज्यातील मंत्री संजय राठोड यांनी पंतप्रधानांचे आव्हान दुर्लक्षित करून आज पोहरादेवी येथे शासकीय दौरा केला. यासाठी त्यांचा शासकीय दौरा निश्चित केला होता.

मंत्री राठोडांचा माजी खासदारांसह हेलिकॉप्टर प्रवास

मुंबईवरून विमानाने संजय राठोड यांनी नागपूर गाठले. त्यानंतर नागपूर विमानतळावरूनच हेलिकॉप्टरने ते पोहरादेवीकडे रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत माजी खासदार विजय दर्डा देखील होते. पोहरादेवी येथे दाखल झाल्यावर मंत्री संजय राठोड यांच्या दौऱ्यात २० पेक्षा अधिक शासकीय वाहने होती, तर १२ ते १५ खासगी वाहने सुद्धा सहभागी झाली होती. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

मंत्री संजय राठोड यांच्याकडून सारवासारव

पंतप्रधानांच्या आवाहनला धुडकावल्याच्या मुद्द्यावर मंत्री संजय राठोड यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न माध्यमांशी बोलतांना केला. ते म्हणाले, ‘‘माजी खासदार विजय दर्डा यांना संग्रहालय बघायचे होते. इतरही अनेक गोष्टी होत्या. त्या तत्काळ करणे आवश्यक होते. त्यामुळे त्यांच्यासोबत आलो. गाड्यांचा ताफा निम्म्यावर केला. पंतप्रधानांचे आवाहनाची अंमलबजावणी केली आहे.’’