नागपूर : एमपीएससीच्या महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२३च्या पदसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ३० एप्रिल २०२३ रोजी आयोजित महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२३ (जाहिरात क्रमांक ००१/२०२३) करीता २० जानेवारी, २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये शासनाच्या मागणीनुसार भरावयाच्या एकूण ८१६९ पदांचा समावेश करण्यात आला होता.

हेही वाचा – पुण्याला जाण्‍यासाठी दररोज केवळ दोन रेल्‍वेगाड्या, त्यात आरक्षण मिळणे कठीण; विदर्भातील प्रवाशांना ट्रॅव्‍हल्‍सशिवाय पर्याय नाही

जाहिरातीमध्ये अंतर्भूत पदांकरीता शासनाकडून सुधारित / अतिरिक्त मागणीपत्र प्राप्त झाल्यास पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल / वाढ होण्याची शक्यता आहे, असे जाहिरातीद्वारे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२३ परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील आता एकूण ८२१७ पदे भरण्यात येणार आहेत. पहिल्यांदाच आयोगाने इतक्या मोठ्या प्रमाणात पदांची जाहिरात काढली आहे.