वर्धा: शैक्षणिक सत्र २०२६ – २७ मधील ११ वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस गती आली असून पहिल्या फेरीअखेर राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत जाहीर प्रकटनानुसार पहिल्या फेरीत ४ लाख ७ हजार २७३ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले. पूणे विभाग यात अव्वल आहे. पण या प्रक्रियेत अनेकांनी चुकीची माहिती भरल्याचे दिसून आले आहे. त्यांचे काय ?
चुकीची माहिती आणि प्रवेश
सन २०२६-२७ च्या इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेदरम्यान अर्ज भरताना नजरचुकीने झालेल्या चुकांमुळे प्रवेश नाकारण्यात आलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शिक्षण संचालनालयाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. अशा विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या पुढील नियमित फेरीत आपल्या अर्जातील माहिती दुरुस्त करण्याची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
राज्यात सध्या इयत्ता ११ वीच्या ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. शिक्षण संचालनालयाने (माध्यमिक व उच्च माध्यमिक) दिलेल्या माहितीनुसार, २१ मे २०२६ पासून प्रवेश प्रक्रियेच्या ‘नियमित फेरी ०१’ ची सुरुवात झाली होती. या पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी २९ मे २०२६ रोजी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली.
प्रवेशात येताहेत अडचणी
मात्र, या गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये (ज्युनिअर कॉलेज) प्रवेश मिळवण्यात अडचणी येत असल्याचे व काही ठिकाणी प्रवेश नाकारण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. काही विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना घाईगडबडीत किंवा नजरचुकीने चुकीची माहिती सबमिट केली होती. कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी गेल्यानंतर कागदपत्र पडताळणीदरम्यान ही माहिती चुकीची असल्याचे आढळल्यामुळे संबंधित महाविद्यालयांनी या विद्यार्थ्यांचे प्रवेश अमान्य (नाकारले) केले होते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
शिक्षण संचालकांचे आदेश
या गंभीर बाबीची तातडीने दखल घेत शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महेश पालकर यांनी २ जून २०२६ रोजी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व जिल्ह्यांचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आणि शिक्षण निरीक्षकांना लेखी परिपत्रक जारी केले आहे. ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश माहितीतील चुकांमुळे नाकारले गेले आहेत, त्यांना ‘नियमित प्रवेश फेरी ०२’ मध्ये अचूक माहिती भरण्याची व अर्ज दुरुस्त करण्याची मुभा दिली जाईल, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे.
या सुविधेबाबत विद्यार्थ्यांनी काळजी करू नये आणि आपल्या स्तरावरून याबाबत कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात, असे आदेश शिक्षण संचालकांनी दिले आहेत. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे शेकडो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्यापासून वाचणार आहे.
