वर्धा : महाराष्ट्र राज्यात सध्या अनेक ठिकाणी सुरू असलेल्या मुसळधार आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर, राज्य शासनाने इयत्ता ११ वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे द्वारे ६ जुलै २०२६ रोजी अधिकृत जाहीर प्रकटन प्रसिद्ध करून या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील काही जिल्ह्यांमधील उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना ६ जुलै २०२६ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

८ जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार

शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी स्वाक्षरी केलेल्या पत्रकानुसार, विशेष फेरी-१ अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालये वाटप झाली आहेत, त्यांना आता महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी दिनांक ०८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत वाढीव कालावधी देण्यात आला आहे. यापूर्वी ही मुदत कमी होती, मात्र आपत्कालीन स्थिती लक्षात घेता ‘सुधारित वेळापत्रक २’ जारी करण्यात आले आहे.

प्रवेश प्रक्रियेची सद्यस्थिती आणि आकडेवारी

राज्यामध्ये शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी एकूण ९,६८८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे.

उपलब्ध माहितीनुसार :
एकूण नोंदणीकृत विद्यार्थी: १४,७३,४२०
प्रवेश निश्चित केलेले विद्यार्थी: १,००,८,०९४
विशेष फेरी-१ चे सुधारित वेळापत्रक (महत्त्वाचे टप्पे)
शिक्षण विभागाने केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (CAP) आणि कोट्यांतर्गत (Quota) प्रवेशासाठी जाहीर केलेले सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

प्रवेश कार्यवाहीचा टप्पा

सुधारित कालावधी / वेळ असा राहणार

विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय वाटप यादी (अलॉटमेंट) प्रदर्शित करणे आणि SMS पाठवणे. | ०३ जुलै २०२६ (दुपारी ३:०० वा.)
वाटप झालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे : (कागदपत्र पडताळणी, शुल्क भरणे, तसेच इन-हाऊस, मॅनेजमेंट व मायनॉरिटी कोट्याचे प्रवेश).०३ जुलै (दु. ४:०० वा.) ते ०८ जुलै २०२६ (सांय. ६:०० वा. पर्यंत
पुढील प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर करणे. ०८ जुलै २०२६ (सायंकाळी ६:०० वा.)
कनिष्ठ महाविद्यालयांचे अंतर्गत कामकाज व डेटा प्रोसेसिंग. ०८ जुलै (सांय. ६:०० वा.) ते ०९ जुलै २०२६ (दु. २:०० वा.)
या फेरीनंतरच्या रिक्त जागांची यादी पोर्टलवर प्रदर्शित करणे. १० जुलै २०२६ (दुपारी १०:०० वा.)

विद्यार्थी आणि पालकांना आवाहन

शिक्षण संचालनालयाने सर्व संबंधित विद्यार्थी, पालक आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांना या सुधारित वेळापत्रकाची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांनी अधिकृत पोर्टल https://mahafyjcadmissions.in वर जाऊन आपली स्थिती तपासावी. प्रवेशादरम्यान काही अडचण आल्यास support@mahafyjcadmissions.in. या ई-मेलवर किंवा ८५३०९५५५६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना या बदलाची व्यापक प्रसिद्धी देण्याचे निर्देश शिक्षण संचालकांकडून देण्यात आले आहेत.