गडचिरोली : विविध गंभीर स्वरुपांच्या गुन्ह्यांत सहभागी असलेल्या नक्षलवाद्यांच्या समर्थकास १ जूनला सी-६० पथकाने जेरबंद केले. भामरागड तालुक्यातील पेरिमिली जंगलात ही कारवाई करण्यात आली. त्याच्यावर शासनाचे दीड लाखांचे बक्षीस होते. सोमा ऊर्फ दिनेश मासा तिम्मा (२३, रा. तोयामेट्टा, ता ओरच्छा, जि. नारायणपूर , छत्तीसगड) असे त्याचे नाव आहे.

अहेरी उपविभागांतर्गत पेरिमिली उपपोलीस ठाणे हद्दीतील जंगल परिसरामध्ये विशेष अभियान पथक, प्राणहिताचे जवान माओवादविरोधी अभियान राबवित होते. तेव्हा तो संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. तो कट्टर माओवादी समर्थक असून २०२० पासून माओवाद्यांसाठी काम करायचा. माओवाद्यांना राशन पुरवणे, गावातील लोकांना बैठकीसाठी जबरदस्तीने एकत्रित आणणे, पोलिसांविरुद्ध कट रचणे, माओवादी सप्ताहामध्ये बॅनर लावणे, पत्रके टाकणे अशी कामे करीत होता. पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, कुमार चिंता, एम. रमेश , उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.

हेही वाचा – “कृषिमंत्र्यांना लाल आणि हिरव्या मिर्चीतील फरक तरी कळतो का?” यशोमती ठाकूर यांची बोचरी टीका; म्हणाल्या…

एक खून, तीन चकमकीसह स्फोटाचेही गुन्हे

सोमा तिम्मावर एकूण सात गुन्हे नोंद आहेत. छत्तीसगडच्या कुतुल (जि. नारायणपूर) येथील आगुळी वडदा या निरपराध व्यक्तीच्या खुनात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. २०२०- २१ मध्ये कुतुल (जि. नारायणपूर) जंगल परिसरातील सोनपूर येथे पोलिसांशी झालेल्या चकमकीतही तो सामील होता. २०२१ मध्ये दुरवडा जि. नारायणपूर जंगलात तसेच २०२२ मध्ये मोहंदी जि. नारायणपूर गावाजवळील जंगल परिसरात हाकीबोडा पोलीस पार्टीसोबत झालेल्या चकमकीमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. याशिवाय कोकामेटा गावातील पुलावर स्फोट घडविला होता. यात चार जवान शहीद झाले होते. मोहंदी तसेच कुतुल रोडवर जमिनीत स्फोटके पुरुन ठेवल्याचा गुन्हाही त्याने केला होता.

हेही वाचा – अकोला : दूषित पाण्यामुळे ४९ ग्रामस्थांची प्रकृती बिघडली

हेडरी पोलिसांच्या केले स्वाधीन

एटापल्ली येथे दाखल जवानांवर हल्ला केल्याचा गुन्हा त्याने २०२३ मध्ये केला होता. या गुन्ह्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास उपविभागीय पोलीस अधिकारी हेडरी यांच्या ताब्यात देऊन अटक करण्यात आली.