गडचिरोली : घरातील कर्त्या व्यक्तीच्या आजारपणामुळे आर्थिक आणि कौटुंबिक संकट ओढवले. आईचीही प्रकृती खालावली. पुढे आईचे निधन झाले. मात्र, या सगळ्या परिस्थितीत शिक्षणाची वाट थांबली नाही. काका-काकूंनी आधार दिला, बहीण खंबीरपणे पाठीशी उभी राहिली, शिक्षक आणि मित्रांनीही प्रसंगी आर्थिक मदत केली. याच बळावर एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथील आकाश मिरवा कुळयेटी याने गडचिरोलीपासून सुरू केलेला शिक्षणाचा प्रवास आता थेट ब्रिटनपर्यंत नेला आहे. ब्रिटनमधील ब्रिस्टल विद्यापीठात अवकाशयान अभियांत्रिकी विषयातील पदव्युत्तर शिक्षणासाठी त्याची निवड झाली असून, सध्या तो तेथे शिक्षण घेत आहे. विशेष म्हणजे, तंत्रज्ञानाच्या या प्रवासासोबतच स्वतःच्या प्रयत्नांतून कला शिकत गडचिरोलीच्या निसर्गाला कलाकृतींच्या माध्यमातून आकार देण्याचा त्याचा प्रयत्नही सुरू आहे.
वडिलांच्या आजारपणाने कुटुंबासमोर संकट
आकाशचे वडील मिरवा मासा कुळयेटी १९८९ मध्ये पोलीस दलात भरती झाले. काही वर्षे सेवा बजावल्यानंतर २००३-०४ च्या सुमारास त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना मानसिक आजाराचा सामना करावा लागला. त्यावेळी आकाश आणि त्याची बहीण अश्विनी दोघेही लहान होते. मुलांच्या शिक्षणावर या परिस्थितीचा परिणाम होऊ नये म्हणून आई कमल यांनी दोन्ही मुलांना सांभाळले. मात्र, पुढे त्यांचीही प्रकृती खालावली. आकाशने बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर २०१९ मध्ये आईचे निधन झाले.
या कठीण काळात दोन्ही काका-काकूंनी भावंडांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली. स्वतःच्या मुलांप्रमाणेच आकाश आणि अश्विनीची काळजी घेतली. आजही सर्व कुटुंबातील तब्बल १४ सदस्य एकत्र राहतात. वडिलांचीही कुटुंबीयांकडून काळजी घेतली जाते. आकाशची बहीण अश्विनी हिने बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर पदवीच्या दुसऱ्या वर्षापर्यंत शिक्षण पूर्ण केले. प्रकृतीच्या कारणामुळे तिला पुढील शिक्षण सोडावे लागले. सध्या ती हॉटेल व्यवस्थापन क्षेत्रात नोकरी करीत असून, आकाशच्या शिक्षणासाठी तिनेही आर्थिक मदत केली.
धानाच्या शेतातून नागपूरपर्यंत
बारसेवाड्यासारख्या दुर्गम गावात आकाशचे बालपण गेले. कुटुंबाची शेती म्हणजे मुख्यतः धानाचे पीक. सुट्टीच्या काळात शिक्षणासोबत तो शेतातही काम करायचा. मात्र, पुढे शिकण्याची जिद्द कायम होती. दहावीनंतर त्याने नागपूर गाठले. बारावीनंतर धारमपेठ तंत्रनिकेतनात विद्युत अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. त्यानंतर प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेऊन विमान व अवकाश अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले.
विमान, रॉकेट, उपग्रह आणि अंतराळयानांची रचना, निर्मिती व तंत्रज्ञानाच्या अभ्यासाची ओढ त्याला पुढे ब्रिटनपर्यंत घेऊन गेली. ब्रिटनमध्ये शिक्षण घेतलेल्या अॅडव्होकेट प्रिया ताडम यांच्या मार्गदर्शनातून त्याला पुढील शिक्षणाच्या संधींची माहिती मिळाली. त्यातून ब्रिस्टल विद्यापीठातील पदव्युत्तर शिक्षणाची वाट खुली झाली.
शिक्षक नाही, स्वतःच कलेचा विद्यार्थी!
आकाशच्या प्रवासातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची कला. त्याने कोणत्याही कला शिक्षकाकडून औपचारिक प्रशिक्षण घेतलेले नाही. निरीक्षण, प्रयोग आणि स्वतःच्या प्रयत्नांतून त्याने चित्रकला आणि कलानिर्मितीची साधना केली. काड्या, वाळलेली पाने आणि निसर्गातील विविध घटकांचा वापर करून तो कलाकृती साकारतो. गडचिरोलीच्या जंगलाकडे, झाडांकडे, पानांकडे आणि निसर्गातील साध्या घटकांकडे पाहण्याची त्याची दृष्टीच त्याच्या कलेत उतरते. एकीकडे अवकाशयानांच्या तंत्रज्ञानाचा अभ्यास, तर दुसरीकडे गडचिरोलीच्या मातीतून आणि निसर्गातून उमलणारी कला—आकाशच्या प्रवासातील हीच अनोखी सांगड आहे.
‘अवकाश’ गाठले, तरी मातीशी नाळ कायम
शिक्षणासाठी गडचिरोली सोडले, नागपूर गाठले आणि आता ब्रिटनमध्ये पोहोचले; मात्र आकाशची आपल्या मातीशी असलेली नाळ तुटलेली नाही. कुटुंबाने दिलेला आधार, शिक्षक-मित्रांनी केलेली मदत आणि प्रतिकूल परिस्थितीतही साथ न सोडणारी बहीण यांना तो आपल्या प्रवासाचे श्रेय देतो. बारसेवाड्याच्या धानाच्या शेतातून सुरू झालेला आकाशचा प्रवास आज अवकाशयान अभियांत्रिकीच्या अभ्यासापर्यंत पोहोचला आहे. आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या तरुणाच्या हातात मात्र अजूनही गडचिरोलीच्या मातीचा गंध आणि निसर्गाला कलात्मक आकार देणारी कुंचल्याची ओढ कायम आहे.
