गडचिरोली : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत खाटा नसल्याने जमिनीवर झोपलेल्या तीन आदिवासी विद्यार्थिनींचा सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर अखेर प्रशासनाने आश्रमशाळांच्या मूलभूत सुविधांकडे लक्ष दिले आहे. गडचिरोलीतील आदिवासी आश्रमशाळांमध्ये नव्या खाटा दाखल झाल्या आहेत. ‘सीजेपी’चे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांनी त्यांच्या ‘एक्स’ खात्यावरून ही माहिती दिली.
जपतलाई येथील आश्रमशाळेच्या वसतिगृहात १० ऑगस्टच्या मध्यरात्री सर्पदंशाच्या घटनेत सहा विद्यार्थिनी बाधित झाल्या होत्या. त्यापैकी दीपिका लकडा, सुष्मिता मंडल आणि अनु कोरेटी या तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. वसतिगृहात पुरेशा खाटा नसल्याने विद्यार्थिनींना जमिनीवर झोपावे लागत असल्याचे या घटनेनंतर समोर आले होते. या घटनेनंतर चौकशी करण्यात आली. संबंधित शाळेतील जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल झाले असून शाळेची मान्यता रद्द करण्यात आली. तसेच इतर अनुदानित आश्रमशाळांमधील सुविधांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले.
या पार्श्वभूमीवर सीजेपीने आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या दयनीय राहणीमानाचा मुद्दा सातत्याने उपस्थित केला. आदिवासी विद्यार्थ्यांनाही इतर विद्यार्थ्यांप्रमाणे सुरक्षित निवास, सन्मानजनक सुविधा आणि चांगले शैक्षणिक वातावरण मिळाले पाहिजे, अशी भूमिका दिपके यांनी मांडली. नव्या खाटा उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असला, तरी जपतलाईच्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आश्रमशाळांमधील सुरक्षितता, स्वच्छता, निवास आणि आरोग्य सुविधांमध्ये कायमस्वरूपी सुधारणा करण्याची गरज आहे.
