होय, खरच आम्हाला माफ करा. स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव होऊन सुद्धा आम्ही तुम्हाला चांगले शिक्षण देऊ शकलो नाही. जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हा तुमच्या धार्मिक, सांस्कृतिक परंपरांचा आदर व जोपासना करत तुम्हाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचे असे स्वप्न या देशातील व्यवस्थेने बघितले होते. ते आम्ही पूर्णत्वास नेऊ शकलो नाही. तुम्ही निसर्गपूजक आहात. रानावनात रमणारे आहात. पशुपक्ष्यांमध्ये एकजीव होणारे आहात. वन्यप्राण्यांवर प्रेम करणारे आहात. तुमच्यामुळे या देशातले जंगल आजवर राखले गेले. त्यातले प्राणी टिकले. ही समृद्ध नैसर्गिक संपत्ती तुम्ही नागर समाजाला दिलेली मौल्यवान देणगी आहे. त्याच्या ऋणात राहून तुमच्या विकासाकडे लक्ष देणे व्यवस्थेचा एक भाग म्हणून आमचे कर्तव्य होते. ते आम्ही पार पाडू शकलो नाही. देशावर इंग्रजांचे राज्य असताना अनेक राजे-महाराजे त्यांना शरण गेले. तुमच्याही जमातीतील काही जमीनदारांनी हाच मार्ग स्वीकारला. मात्र समाज म्हणून तुम्ही या परकीयांच्या चरणी लोटांगण घातले नाही. उलट तुम्ही अनेक ठिकाणी या राजवटीविरोधात लढले. गडचिरोलीतील जाराबंडीचा लढा आजही त्याची साक्ष पटवतो. त्याच गडचिरोलीत तुमच्या तीन मुली चक्क शाळेत साप चावून मरतात. त्यांना झोपण्यासाठी आम्ही साधे पलंग देऊ शकलो नाही. पलंग खरेदीवर खर्च झालेले पैसे नेमके गेले कुठे याचा छडा लावू शकलो नाही. ही व्यवस्था तुम्हाला सुधारण्यासाठी नाही तर लुटण्यासाठीच जन्माला आली याची आम्हाला लाज वाटते. तुमच्यातले मागासलेपण दूर व्हावे यासाठी आम्ही गर्द जंगलात शाळा उघडल्या. त्याच्या व्यवस्थापनावर हजारो कोटी रुपये खर्च केले. तरीही तुम्ही आधी होता त्याच स्थितीत आजही आहात. असे काही घडले की तुमच्या डोळ्यातले अश्रू बघून कुणालाही फारसे वाईट वाटत नाही. तुमच्याविषयी थोडीफार संवेदना व्यक्त केली की हीच व्यवस्था इतर कामाकडे लक्ष द्यायला सुरुवात करते. तुम्ही जसे होते तसेच राहता.

लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पीय तरतूद पदरात पाडून घेणारे तुम्ही एकमेव आहात. धोरणकर्त्यांचा उद्देश हाच होता की तुम्ही लवकर प्रगत व्हावे. प्रत्यक्षात झाले उलटेच. तुमच्यासाठी राखीव असलेल्या निधीवर व्यवस्थेतले अनेक लोक गब्बर झालेत. तुमच्या भल्यासाठी नेमलेल्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी प्रचंड माया जमवली. त्यातला एक तर निवृत्तीनंतर नागपुरात उद्योजक झालेला. त्याने मिळवलेला हा पैसा तुमच्या विकासासाठी होता पण प्रत्यक्षात या अधिकाऱ्यानेच विकास साधला. तुमच्या जमातीतून समोर आलेल्या नेतृत्वाने सुद्धा तुमच्याकडे कायम पाठ फिरवली. आजवर जेवढे मंत्री झाले त्यांनी तुमच्याऐवजी स्वत:चेच कल्याण करून घेतले. राज्यातल्या जेवढ्या अनुदानित आश्रमशाळा आहेत, त्या या नेत्यांच्या आहेत. शाळांच्या माध्यमातून पैसा खाणे हेच सूत्र या सर्वांनी आजवर पाळले. या खादाड नेत्यांचा संचार सर्वपक्षीय. ज्याने जमातीच्या भल्यासाठी झटायचे असते तेच फितूर निघाले. त्याचा मोठा फटका तुम्हाला सहन करावा लागला. तुमच्या, तुमच्या मुलांच्या इच्छा, आकांक्षा काय हे आजवर आम्ही कधीच तुम्हाला विचारले नाही. तुमचे भले व त्यासोबत आमचे भले कशात आहे हे आम्हीच ठरवत गेलो व एकेक योजना तुमच्यावर लादत गेलो. जे इंग्रजांनी केले तेच आम्ही केले. त्यामुळे तुमच्या वाट्याला विकासाऐवजी केवळ हालअपेष्टा व दु:ख आले. तुमचे नाव वापरून बक्कळ पैसा कमावता येतो हे राज्यकर्त्यांच्या लक्षात आले व तुमचा केवळ साधन म्हणून वापर सुरू झाला. तुमच्यातले मागासलेपण नेमके किती व कसे याच्या सर्वेक्षणावर कोट्यवधी रुपये खर्च झाले. ते करणाऱ्या संस्था मालामाल झाल्या. सर्वेक्षणाचे अहवाल तसेच धूळखात पडून राहिले. तुम्हाला शाळेत चांगले जेवण मिळावे म्हणून आम्ही अनेक योजना आखल्या. अगदी विदेशातल्या संस्थांना त्याची कंत्राटे दिली पण अन्नातून होणारी विषबाधा आम्ही थांबवू शकलो नाही. या ७५ वर्षात फक्त एकाच गोष्टीत फरक पडला. तुमच्यासाठी म्हणून आणलेल्या कोणत्या योजनेत जास्त मलिदा मिळेल यावर व्यवस्थेचे डोके अधिक सुपीकपणे काम करू लागले. तुम्ही जंगलात राहणारे. अनादी काळापासून तुमच्यावर प्रस्थापितांनी अत्याचार केले. स्वातंत्र्यानंतर हे सारे थांबेल या आशेवर तुम्ही होता पण आम्ही तुमच्या पदरात केवळ निराशा टाकली. जेव्हा नक्षलवादाचा उगम झाला तेव्हा त्यांचा विचार ऐकून तुमच्या मनात दुसऱ्या स्वातंत्र्याची आशा निर्माण झाली. व्यवस्थेने आजवर भले केले नाही, किमान हे तरी करतील असे तुम्हाला वाटले. सुरुवातीला या नक्षलींनी तुमच्यासाठी आवाज उठवला. काही लाभाच्या गोष्टी तुमच्या पदरातही पडल्या. नंतर हीच हिंसक चळवळ तुमचाच घास घ्यायला निघाली. वर्गशत्रूच्या नावावर तुमचेच मुडदे पाडायला लागली. नंतर ही हिंसा एवढी वाढली की तुमचा श्वास कोंडला जाऊ लागला. दुसरे स्वातंत्र्य तर दूरच राहिले.

या मरणसत्रातून बाहेर कसे पडायचे यासाठी तुमची धडपड सुरू झाली. दोन्ही बाजूच्या बंदुका व त्यात फसलेले तुम्ही असे चित्र दीर्घकाळ दिसत राहिले. कुठल्याही हिंसक चळवळीला शेवट असतोच तसेच नक्षलींच्या बाबतीत झाले. ती संपली आणि तुम्ही सुटकेचा नि:श्वास सोडला. नक्षली आहेत म्हणून विकास करता येत नाही असा बहाणा आजवर करणाऱ्या व्यवस्थेने या चळवळ समाप्तीवर टाळ्या पिटल्या. आतातरी विकासाची फळे चाखायला मिळतील अशी आशा तुमच्यात पल्लवित झाल्या. तुमच्या अपेक्षा वाढल्या. त्यावर व्यवस्थेने पुन्हा एकदा पाणी फेरणे सुरू केले. मुळात या व्यवस्थेला तुम्ही प्रगत झालेलेच नको आहात. तसे झाले तर तुमच्या नावावर त्यांना पैसा कसा खाता येईल? तुम्ही असेच अस्तित्वहीन राहिलात, सारे अन्याय अत्याचार मूकपणे सहन करत राहिलात तरच ही व्यवस्था खूश राहील. तुमच्या वाट्याला येणारी दु:खे केवळ तुम्ही राहता त्या ठिकाणी म्हणजे दुर्गम भागातच येतात असे नाही. तुम्ही शिक्षणाच्या निमित्ताने शहरात गेलात तरी तुम्हाला अवहेलना, अपमान सहन करावा लागतो. कधी तुम्हाला नक्षली ठरवले जाते तर कधी देशद्रोही. अलीकडे नागरिकांच्या अभिव्यक्तीवर बंधने लादण्याची आवड या व्यवस्थेत निर्माण झाली आहे. सरकारच्या छत्रछायेखाली शिक्षण घेता ना! मग आम्ही म्हणू तसे वागा असे आदेश काढले जाताहेत. त्याविरोधात तुम्ही लढा देत असलात तरी त्यात यश मिळण्याची शक्यता कठीण. नक्षली संपले तरी या शब्दाचा राजकीय वापर करण्याचे काम थांबलेले नाही. मुळात ही व्यवस्थाच तुमच्या हिताची नाही. त्यामुळे स्वातंत्र्यात राहूनही पारतंत्र्याचा अनुभव तुम्ही पदोपदी घेत आहात. एक नागरिक म्हणून तुमच्या वाट्याला येणाऱ्या या वागणुकीबद्दल आम्हाला माफ करा. एवढेच आमच्या हाती आहे.