गडचिरोली : प्रस्तावित पोलाद प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनाविरोधातील शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. आष्टी येथील मुख्य चौकात शेतकऱ्यांनी रात्रभर ठिय्या मांडून चक्काजाम आंदोलन सुरूच ठेवले. त्यामुळे आष्टी चौकातून जाणाऱ्या तीनही बाजूंची वाहतूक ठप्प झाली असून, या मार्गावरील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आंदोलनस्थळी येऊन भूसंपादनाचा आदेश रद्द करावा, या मागणीवर १३ गावांतील शेतकरी ठाम आहेत.

जयरामपूर-येनापूर परिसरातील १३ गावांतील शेतकऱ्यांनी २९ ऑक्टोबरपासून येनापूर येथील मंडळ अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. एमआयडीसीच्या प्रस्तावित दुसऱ्या आणि पाचव्या टप्प्यातील एकूण २ हजार ९६ हेक्टर जमीन भूसंपादनातून वगळावी, अशी त्यांची मागणी आहे. प्रशासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याने आंदोलनाची व्याप्ती वाढवत शेतकऱ्यांनी चक्काजामचा मार्ग स्वीकारला. आष्टी येथेही आंदोलन सुरू झाल्याने परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे.

दरम्यान, आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. पाच नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणून त्यांच्या समस्या मांडण्याची तयारी त्यांनी दर्शविली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. मात्र, या चर्चेच्या निमंत्रणावरून आंदोलकांमध्ये मतभिन्नता निर्माण झाली आहे.

भेंडाळा परिसरातील शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ पाच नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी जाणार आहे. मात्र, येनापूर परिसरातील शेतकऱ्यांनी नागपूरला जाऊन चर्चा करण्यास नकार दिला आहे. मुख्यमंत्री स्वतः आंदोलनस्थळी आले पाहिजेत आणि शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून भूसंपादनाचा आदेश रद्द केला पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या चर्चेच्या निमंत्रणानंतरही आंदोलनाचा तिढा कायम आहे.

सामान्य प्रवाशांचे हाल

आष्टीच्या मुख्य चौकात रात्रभर सुरू असलेल्या चक्काजाममुळे तीनही दिशांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गावरून प्रवास करणारे नागरिक, कामानिमित्त बाहेर पडलेले प्रवासी आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे, शेतकरी आंदोलन मागे घेण्यास तयार नसल्याने वाहतूक कधी पूर्ववत होणार, याबाबत अनिश्चितता कायम आहे. पाच नोव्हेंबरच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेतून काही तोडगा निघणार का आणि येनापूरच्या शेतकऱ्यांची भूमिका बदलणार का, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत आष्टीतील चक्काजाम कधी सुटणार, हा प्रश्न कायम आहे.