गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील मुधोली चक (क्र. २) येथे प्रस्तावित पोलाद प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या ड्रोन सर्वेक्षणाच्या वादाने शुक्रवारी नवे वळण घेतले. बेकायदेशीर ड्रोन सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांविरुद्ध दंगलीसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करून चौकशीसाठी नोटिसा बजावण्यात आल्याने संतप्त झालेल्या हजारो शेतकऱ्यांनी प्रथम आष्टी पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात धरणे देत चंद्रपूर, अहेरी आणि चामोर्शीकडे जाणारे तीनही प्रमुख मार्ग रोखून धरल्याने वाहतूक विस्कळीत झाली आणि प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.

९ जुलै रोजी मुधोली चक (क्र. २) येथे ‘वरद फेरो’ कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना किंवा ग्रामस्थांची संमती न घेता ड्रोनद्वारे सर्वेक्षण केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकाराचा निषेध करत शेतकऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना रोखून जाब विचारला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करून शिवम कल्लोडे, सचिन विश्वकर्मा आणि प्रवीण पोटूवार यांची सुटका केली होती. त्याचवेळी ड्रोन उडविल्याप्रकरणी संबंधितांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शेतकऱ्यांवर गंभीर कलमांखाली गुन्हे

या घटनेनंतर शिवम कल्लोडे यांच्या तक्रारीवरून नेमाजी घोगरे, विनोद भोयर, गुरुदास ठुसे, गुरुदास आभारे, सुधाकर गुट्टे, विवेक खोब्रागडे, वसंत बुरमवार यांच्यासह ३० ते ४० अनोळखी व्यक्तींविरुद्ध मारहाण, बेकायदेशीर जमाव आणि दंगलीसह विविध कलमांखाली आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यांची माहिती न देता थेट ७ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्याच्या नोटिसा मिळाल्याने मुधोलीसह परिसरातील १३ गावांतील हजारो शेतकरी संतप्त झाले.

गुन्हे मागे घ्या; अन्यथा सर्वांनाच अटक करा’

नुकतेच आष्टी पोलिस ठाण्यात रुजू झालेले पोलिस निरीक्षक महेंद्र वाघ यांनी आंदोलकांशी चर्चा करून परिस्थिती निवळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, “गुन्हे मागे घ्या, अन्यथा उपस्थित सर्व शेतकऱ्यांना अटक करा,” अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. त्यानंतर अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी हेमंत चांदेवार यांनीही घटनास्थळी धाव घेतली. सुमारे तीन तास चर्चा होऊनही तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांनी आंबेडकर चौकात ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे चंद्रपूर, अहेरी आणि चामोर्शी या तिन्ही मार्गांवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

“दाखल गुन्ह्यांच्या अनुषंगाने संबंधितांनी कायदेशीर प्रक्रियेला सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानंतर आंदोलकांनी चौकात आंदोलन सुरू केले असून त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.” — हेमंत चांदेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी, अहेरी