गडचिरोली: जिल्ह्यातील पोर्ला येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचा संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारा कारभार चव्हाट्यावर आला आहे. मृत्यूशी झुंज देणाऱ्या आणि कोमात असलेल्या एका वृद्ध महिलेला केवळ पैशांच्या निकडीपोटी चारचाकी वाहनाने बँकेच्या दारात आणण्याची वेळ नातेवाईकांवर आली. बँकेच्या या आडमुठ्या धोरणामुळे सर्वसामान्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, संबंधित व्यवस्थापकाची हकालपट्टी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

काटली येथील रहिवासी शांताबाई मानकर या मागील काही दिवसांपासून कोमात आहेत. त्यांच्यावर सुरू असलेल्या महागड्या औषधोपचारासाठी पैशांची अत्यंत गरज असल्याने, त्यांची मुलगी आणि जावई २५ फेब्रुवारी रोजी पोर्ला येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत पोहोचले. खातेदार कोमात असल्याने त्यांच्या अंगठ्याचा ठसा घेऊन पैसे देण्याची विनंती नातेवाईकांनी केली.

मात्र, शाखा व्यवस्थापकाने “खातेदाराला प्रत्यक्ष हजर करा, त्याशिवाय पैसे देणार नाही,” अशी ताठर भूमिका घेतली. वास्तविक, खातेदार गंभीर आजारी असल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन किंवा बँकेने प्रतिनिधी पाठवून खातरजमा करणे अपेक्षित असताना, नातेवाईकांना वारंवार चकरा मारण्यास भाग पाडले गेले. अखेर हतबल झालेल्या नातेवाईकांनी भाड्याने गाडी करून कोमातील वृद्धेला बँकेच्या दारात आणले. हा हृदयद्रावक प्रसंग पाहून बँकेत उपस्थित असलेल्या इतर ग्राहकांनीही संताप व्यक्त केला.

या शाखेचा कारभार केवळ असंवेदनशीलतेपुरता मर्यादित नसून, येथे आर्थिक गैरप्रकारही फोफावले असल्याचे समोर आले आहे. आठ दिवसांपूर्वीच वसा येथील एका खातेदाराच्या खात्यातून बँकेतील कर्मचाऱ्याने बनावट स्वाक्षरी करून पैसे लांबवल्याचा प्रकार घडला होता. तक्रार केल्यानंतर पैसे परत मिळाले असले, तरी या घटनेने बँकेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

येथील अधिकाऱ्यांच्या उद्धट वर्तणुकीमुळे त्रस्त झालेल्या पोर्ला ग्रामस्थानी ४ फेब्रुवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत या अधिकाऱ्यांच्या बदलीचा ठराव सर्वानुमते मंजूर केला आहे. मात्र, उच्च पदस्थ बँक प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने अधिकाऱ्यांची मनमानी अधिकच वाढली आहे.

एकीकडे डिजिटल बँकिंग आणि ग्राहक सेवेच्या गप्पा मारल्या जात असताना, गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात वृद्ध आणि आजारी रुग्णांना दिली जाणारी ही वागणूक प्रशासकीय यंत्रणेच्या संवेदनशून्यतेचे दर्शन घडवणारी आहे. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई न झाल्यास परिसरात तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.