गडचिरोली : स्वातंत्र्याच्या अमृतकाळात विकासाचे मोठमोठे दावे केले जात असताना, गडचिरोलीच्या दुर्गम भागातील वास्तव किती विदारक आहे, याची प्रचिती भामरागड तालुक्यातील दर्भा परिसरात पुन्हा एकदा आली आहे. रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रुग्णाला उपचारासाठी चक्क बांबूच्या कावडीवर बांधून डोंगरदऱ्यातून पायपीट करत मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागले. या हृदयद्रावक घटनेमुळे प्रशासकीय यंत्रणेचे वाभाडे निघाले असून, दुर्गम भागात साधे रस्तेही नसल्याने नागरिकांचे प्राण कसे टांगणीला लागतात, हे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.
भामरागड तालुक्यातील दर्भा परिसरात गेल्या ४८ तासांत रानडुकरांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. पहिली घटना ३० एप्रिल रोजी सकाळी ९:३० च्या सुमारास घडली. येथील मुल्ला चैतु पिडसे (५०) हे आगामी तेंदूपत्ता हंगामाच्या तयारीसाठी जंगलात दोरी आणण्यासाठी गेले होते. धोडराजच्या घनदाट जंगलात अचानक एका रानडुकराने त्यांच्यावर झडप घालून पोटावर जबर हल्ला केला. सोबत असलेल्या लोकांनी आरडाओरडा केल्याने डुकराने तिथून पळ काढला, मात्र मुल्ला हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. रुग्णवाहिका जंगलात येणे अशक्य असल्याने ग्रामस्थांनी तात्काळ बांबूची कावड तयार केली आणि जखमी मुल्ला यांना त्यात झोपवून सुमारे एक किलोमीटरची डोंगरदऱ्यातून खडतर पायपीट केली. मुख्य रस्त्यावर रुग्णवाहिका आल्यानंतर त्यांना भामरागड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ही घटना ताजी असतानाच, दुसऱ्याच दिवशी म्हणजे १ मे रोजी सकाळी १०:३० वाजता याच गावातील मादी टुगे पुंगाटी (४५) या महिलेवर रानडुकराने हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या दोन्ही जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते.
तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच वन्य प्राण्यांचे हल्ले वाढल्याने मजूर आणि ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. वनविभागाने या परिसरात तात्काळ गस्त वाढवावी आणि जखमींना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे. डोंगरदऱ्यात रस्ते नसल्याने रुग्णाला कावडीवरून न्यावे लागणे, हे या भागातील संघर्षाच्या पाचवीलाच पुजलेले दुःख असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे.
