गडचिरोली : शहरातील चंद्रपूर मार्गावरील कारगिल चौक परिसरात २७ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता दुचाकीसमोर डुक्कर आल्याने झालेल्या अपघातात भाजपचे नेते व पालिकेतील स्वच्छता आणि आरोग्य सभापती मुक्तेश्वर काटवे (५६) यांचा मृत्यू झाला.
पोलिसांच्या माहितीनुसार, मुक्तेश्वर काटवे हे कारगिल चौकामार्गे रात्री १० वाजता दुचाकीवरून घराकडे जात होते. डुकराने दिलेल्या धडकेत ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर त्यांना मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. मुक्तेश्वर काटवे यांनी भाजपचे माजी शहराध्यक्षपद आणि नगरपालिकेचे सभापतीपदही भूषविले होते. यावेळी देखील त्यांनी नशीब आजमावले आणि जनतेने त्यांना नगरसेवक म्हणून पालिकेत निवडून पाठवले आणि त्यांना स्वच्छता आणि आरोग्य सभापती म्हणून संधी मिळाली होती.
त्यांचा विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग होता. त्यांच्या अकाली निधनाने शहराच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. काटवे यांच्या पार्थिवावर आज २८ फेब्रुवारी रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली.
महामार्गवरील डुकरांचा उपद्रव सामान्यांच्या जीवावर
दरम्यान, कारगिल चौकातील वाढत्या वाहतूक कोंडीसह मोकाट डुकरांचा उपद्रव हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सभापतींनाच प्राण गमवावे लागल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. यापूर्वीही रस्त्यावरील मोकाट डुकरांमुळे अपघात घडले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
