गडचिरोली : कोठी-कोरणार पूल कोसळल्यानंतर अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाला जिल्ह्यातील पुलांच्या सुरक्षेबद्दल काळजी निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले यांनी गुरुवारी दिले. निकृष्ट अथवा सदोष काम आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
अतिवृष्टी आणि पुराच्या काळात जिल्ह्यातील अनेक भागांचा संपर्क तुटतो. त्यामुळे सर्व पुलांची सद्यस्थिती, भारवहन क्षमता, दुरुस्तीची गरज आणि पुनर्बांधणीची आवश्यकता तपासून प्राधान्यक्रम निश्चित करण्याचे निर्देश मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. विशेषतः पुरामुळे प्रभावित होणाऱ्या पुलांची तपासणी प्राधान्याने करण्यास सांगण्यात आले. मात्र, कोठी-कोरणार पूल कोसळल्यानंतरच जिल्ह्यातील सर्व पुलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा गांभीर्याने घेतला जात असल्याने विभागाच्या देखरेखीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कोठी-कोरणारपुरता प्रश्न मर्यादित नसून यापूर्वीही जिल्ह्यातील इतर पूल कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.
स्वतंत्र विशेष पॅकेज देण्याची मागणी
आजाद समाज पक्षाचे अध्यक्ष राज बनसोड यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले. कोठी-कोरणार पूल तसेच इतर पूल कोसळण्याच्या घटनांची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी त्यांनी केली. तत्कालीन अधीक्षक अभियंता नीता ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग, आलापल्लीचे कार्यकारी अभियंता बलवंत रामटेके यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणीही बनसोड यांनी केली. जिल्ह्यातील पुलांचा अनुशेष भरून काढण्यासाठी स्वतंत्र विशेष पॅकेज देण्याची मागणी सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी बैठकीत केली. कोकणच्या धर्तीवर गडचिरोलीतील आवश्यक पुलांसाठी स्वतंत्र निधी पॅकेजचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडण्यात येणार असल्याचे भोंसले यांनी सांगितले.
४९२ कोटींच्या मायनिंग कॉरिडॉर कामांचा आढावा
याशिवाय ‘एआयआयबी’ अंतर्गत २७७.६० किलोमीटरच्या सहा रस्त्यांसाठी २,७५२ कोटी रुपयांचे प्रस्ताव आणि सुमारे ४९२ कोटींच्या मायनिंग कॉरिडॉर कामांचाही आढावा घेण्यात आला. रस्ते-पुलांच्या कामात थर्ड पार्टी क्वालिटी ऑडिट आणि तांत्रिक निकषांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे तसेच विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी देखील उपस्थित होते
