गडचिरोली : आंघोळीसाठी बाथरूममध्ये पाणी गरम करायला गेलेल्या तरुणाचा ‘हिटर’चा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. जयंत मनोहर भांडेकर(२४, रा. गडचिरोली) असे या मृत तरुणाचे नाव असून, तो पीठ गिरणी व्यावसायिक होता. या घटनेमुळे गडचिरोली शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयंत भांडेकर हे शहरातील प्रसिद्ध ‘जयंत आटा चक्की’चे संचालक म्हणून परिचयाचे होते. शुक्रवारी नेहमीप्रमाणे दिवसभराचे व्यावसायिक काम आटोपून ते रात्री घरी परतले होते. आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले असता, तेथे पाणी गरम करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या ‘हिटर’मध्ये अचानक विद्युत प्रवाह उतरला. याचा जोरदार झटका (इलेक्ट्रिक शॉक) बसल्याने जयंत बाथरूममध्येच कोसळले. बराच वेळ होऊनही ते बाहेर न आल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता जयंत निपचित अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

जयंत भांडेकर हे त्यांच्या साध्या आणि हसतमुख स्वभावामुळे परिसरात सर्वांच्या परिचयाचे होते. कष्टकरी वृत्ती आणि सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध यामुळे त्यांनी अल्पावधीतच परिसरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या अशा आकस्मिक निधनामुळे भांडेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. आज शनिवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, एका उमद्या व्यक्तिमत्त्वाच्या अकाली जाण्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

विद्युत उपकरणांचा वापर करताना सावधानता बाळगा

या दुर्दैवी घटनेने घरातील विद्युत उपकरणांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गिझर, हिटर किंवा तत्सम उपकरणे वापरताना ती वेळोवेळी तपासून घेणे आवश्यक आहे. बाथरूममध्ये ओलावा असल्याने विद्युत प्रवाह उतरण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे गिझरचे बटण आंघोळीपूर्वी बंद करणे, ‘अर्थिंग’ची तपासणी करणे आणि तांत्रिक बिघाड आढळल्यास त्वरित दुरुस्ती करणे अनिवार्य आहे. छोटीशी निष्काळजी जीवघेणी ठरू शकते, असा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे.