गडचिरोली: छत्तीसगडच्या सीमेवरील अबुझमाडच्या दुर्गम आणि घनदाट अरण्यात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या चकमकीत गडचिरोली पोलिसांच्या ‘सी-६०’ पथकाने नक्षलवाद्यांना मोठा दणका दिला आहे. गडचिरोली विभागीय समितीचा प्रभारी आणि २५ लाखांचे बक्षीस असलेला जहाल नक्षल नेता प्रभाकर याच्यासह सात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. मात्र, नक्षलवाद्यांशी निकराची झुंज देताना अहेरी तालुक्यातील मांड्रा येथील सुपुत्र दीपक चिन्ना मडावी (३८) हे जवान शहीद झाले.

भामरागड तालुक्यातील फोदेवाडा परिसरातील जंगलात नक्षलवाद्यांच्या ‘कंपनी क्रमांक १०’चे सदस्य तळ ठोकून असल्याची गोपनीय माहिती पोलीस दलाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे ३ फेब्रुवारी रोजी पोलीस उपअधीक्षक अमर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सी-६० च्या १४ पथकांनी शोधमोहीम हाती घेतली. ४ फेब्रुवारी रोजी नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. घनदाट झाडी आणि डोंगराळ भागाचा फायदा घेत नक्षलवाद्यांनी जवानांना रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु जवानांनी चोख प्रत्युत्तर दिला. दोन दिवस चाललेल्या या धुमश्चक्रीत सात नक्षलवादी ठार झाले असून, यामुळे नक्षलवाद्यांच्या कंपनी १० चे कंबरडे मोडले आहे. नक्षलवाद्यांचे दोन तळ उद्ध्वस्त केल्यानंतर घटनास्थळावरून जवानांनी युद्धसदृश साहित्य आणि शस्त्रसाठा जप्त केला आहे. यामध्ये ३ एके-४७ रायफल्स, १ एसएलआर रायफल, १ .३०३ रायफल, मोठ्या प्रमाणात काडतुसे आणि पिट्टू (साहित्य) जप्त करण्यात आले.

या चकमकीत शहीद झालेले जवान दीपक मडावी यांनी अतुलनीय शौर्य गाजवले. स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता त्यांनी दोन नक्षलवाद्यांना टिपले. मात्र, समोरून आलेल्या गोळीने त्यांना वीरगती प्राप्त झाली. या चकमकीत दुसरे जवान जोगा मडावी हेदेखील जखमी झाले असून, त्यांच्या डोक्याला गोळी चाटून गेली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

प्रभाकरसारखा बडा नेता मारला जाणे, हा नक्षलवादी चळवळीसाठी सध्याच्या घडीतील सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. पोलीस दलाच्या नोंदीनुसार, या कारवाईनंतर आता या कंपनीत केवळ दोनच नक्षलवादी शिल्लक उरले आहेत. आमच्या जवानांनी प्राणाची बाजी लावून हीं मोहीम यशस्वी केली, अशी प्रतिक्रिया गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.