गडचिरोली : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचे झालेले नुकसान आणि डोक्यावरील कर्जाचा वाढता बोजा यामुळे शेतकरी कुटुंबांपुढील संकट अधिक गडद होत आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असताना पावसाने दडी मारल्याने शेतातील धानपीक करपून गेले. परिणामी यंदा हाती काहीच उत्पादन येणार नाही आणि सोसायटी, बचत गट तसेच बँकेचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथील ३६ वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी उघडकीस आली. सचिन भाऊजी सातपूते असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, सचिन सातपूते हे घटनेच्या दिवशी सकाळी आठ वाजताच्या सुमारास शेतावर गेले होते. यंदा पावसाच्या अनियमिततेचा मोठा फटका त्यांच्या शेतीला बसला. पावसाअभावी शेतातील धानपीक करपून गेल्याने उत्पादनाची आशा मावळली होती. दुसरीकडे, शेतीसाठी घेतलेले अडीच ते तीन लाख रुपयांचे कर्ज फेडण्याची चिंता त्यांना सतावत होती. सोसायटी, बचत गट आणि बँकेचे कर्ज डोक्यावर असताना उत्पन्नाचे साधनच संकटात सापडल्याने ते आर्थिक विवंचनेत होते. यातूनच त्यांनी स्वतःच्या शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले.

दरम्यान, चामोर्शी तालुक्यात यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे धान उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यातच गडचिरोली जिल्ह्यात विविध औद्योगिक प्रकल्पांसाठी सुरू असलेल्या जमीन अधिग्रहणाच्या प्रक्रियेवरूनही शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. शेतीचे भवितव्य, जमिनीचा मोबदला आणि उपजीविकेच्या प्रश्नांमुळे ग्रामीण भागात अस्वस्थता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शेतीतील अनिश्चितता आणि कर्जबाजारीपणाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सचिन सातपूते यांच्या निधनाने भेंडाळा परिसरात शोककळा पसरली असून, त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक सुरक्षिततेचा आणि शेतीसमोरील वाढत्या आव्हानांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, चामोर्शी पोलिसांनी संदर्भात नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.