गडचिरोली : बारावीच्या परीक्षेची कॉपी करण्यासाठी चक्क कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केल्याचा धक्कादायक प्रकार चामोर्शी येथे उघडकीस आला आहे. राज्यशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये ‘चॅट जीपीटी’च्या मदतीने उत्तरे शोधून ती विद्यार्थ्यांना पुरविणाऱ्या टोळीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीच पकडले.
या प्रकरणी केंद्रसंचालकासह चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.चामोर्शी येथील जा. कृ. बोमनवार विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर (क्र. ०६१५) सर्व काही सुरळीत सुरू असल्याचा आव आणला जात होता. मात्र, पडद्यामागे तंत्रज्ञानाचा गैरवापर करून चक्क प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे ‘चॅट जीपीटी’वर शोधली जात होती.
१८ फेब्रुवारी रोजी राज्यशास्त्राचा पेपर सुरू असताना, सायंकाळी ४:५५ च्या सुमारास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांचे भरारी पथक अचानक केंद्रावर धडकले. परीक्षेचे शेवटचे काही मिनिटे शिल्लक असताना झालेल्या या अनपेक्षित कारवाईमुळे केंद्रावरील कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.
या केंद्रावर तैनात असलेल्या काही कर्मचाऱ्यांच्या हालचाली संशयास्पद आढळल्यानंतर गाडे यांनी सखोल चौकशी केली. तेव्हा चॅट जीपीटीच्या मदतीने काढलेली उत्तरे आणि त्यांच्या प्रिंट्स हस्तगत करण्यात आल्या. तंत्रज्ञानाचा असा ‘हायटेक’ वापर पाहून प्रशासनही अवाक झाले आहे.
शिक्षण क्षेत्रात खळबळ; चौघांवर गुन्हे
या गैरप्रकारात थेट सहभाग असल्याचा ठपका ठेवत केंद्रसंचालक महेंद्र वसंतराव बुर्लावार, पर्यवेक्षक सुशील रामचंद्र लांजेवार, शिक्षक महेंद्र बाबूराव किरमे आणि शिपाई सूरज प्रमोद केळझरकर या चौघांविरुद्ध चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक अधिनियम १९८२ अन्वये ही कारवाई करण्यात आली असून, या सर्वांच्या निलंबनाच्या प्रस्तावावरही शनिवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून परीक्षेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

