गडचिरोली : पंतप्रधान स्वयंरोजगार योजनेच्या नावाखाली चामोर्शी येथील सुमारे ४० महिलांची लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात आता प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त होत आहे. कारवाईच्या मागणीसाठी मागील चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या महिलांपैकी चार जणांची प्रकृती खालावली असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोषींवर कारवाई होईपर्यंत माघार नाही, असा आक्रमक पवित्रा या महिलांनी घेतला आहे.

काही दिवसांपूर्वीच या महिलांनी पत्रकार परिषदेत प्रशासनाला उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्याने पीडित महिलांनी २३ फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष उपोषणाचे हत्यार उपसले. भर उन्हात सुरू असलेल्या या आंदोलनामुळे महिलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. चामोर्शी येथील स्थानिक भाजप नगरसेवक आशिष पिपरे यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप पीडित महिलांनी केला असून, या प्रकरणी अद्याप कोणतीही ठोस कायदेशीर कारवाई न झाल्याने महिलांमध्ये तीव्र संताप आहे.

२०२० मध्ये आशिष पिपरे यांनी चामोर्शी येथील गरीब शेतकरी व शेतमजूर महिलांना रोजगाराचे आमिष दाखवून एकत्र केले. अगरबत्ती उद्योगासाठी ‘पंतप्रधान स्वयंरोजगार योजने’अंतर्गत बँक कर्ज मिळवून देतो आणि ते कर्ज नंतर माफ करून देतो, असे खोटे आश्वासन महिलांना दिले. बँकेशी संगनमत करून प्रत्येकी १ लाख ९० हजार रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले. मात्र, या रकमेतील मोठा हिस्सा पिपरे यांनी स्वतःच्या खात्यात वळवून घेतला आणि महिलांना केवळ १० हजार रुपये अग्रीम म्हणून दिले, असा आरोप महिलांनी केला आहे.

स्वयंरोजगारासाठी देण्यात आलेल्या अगरबत्ती मशीन खरेदीतही मोठा अपहार झाल्याचा आरोप निवेदनात आहे. अहमदाबाद येथील एका कंपनीकडून १ लाखांचे देयके दाखवून प्रत्यक्षात केवळ २५,५०० रुपयांच्या हलक्या दर्जाच्या मशीन आणल्या गेल्या. या सर्व मशीन पिपरे यांनी स्वतःच्या मालकीच्या शेडमध्ये लावून ‘आरएन ट्रेडिंग कंपनी’च्या नावाने प्रकल्प सुरू केला आणि सहा महिन्यांत तो बंद पाडून महिलांना देशोधडीला लावले.

दरम्यान, बँकेने कर्जाच्या वसुलीसाठी नोटिसा धाडल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एप्रिल २०२५ च्या ‘जनता दरबारात’ या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही प्रशासनाने कुठलीही कारवाई केलेली नसल्याने महिलांनी आता उपोषण सुरु केले आहे.

यासंदर्भात पीपरे यांनी सर्व आरोप निराधार असून राजकीय हेतूने प्रेरित आहेत. माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी हा प्रकार केला जात आहे. राजकीय वैमनस्यातून बिनबुडाचे आरोप करण्याऐवजी संबंधितांनी माझ्याविरुद्ध पोलीस ठाणे किंवा न्यायालयात जावे. बदनामी करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.