गडचिरोली : गेल्या काही महिन्यांपासून चामोर्शी-गडचिरोली मार्गावर सुरू असलेले अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, मंगळवारी दुपारी या मार्गाने पुन्हा एकदा एका निष्पाप जिवाचा बळी घेतला आहे. आष्टी-चामोर्शी मार्गावरील जामगिरी फाट्याजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात होऊन गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे (जीएमसी) कार्यालयीन अधीक्षक विनोद कुमरे (५७) यांचा मृत्यू झाला. या अपघातात कारमधील अन्य तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद कुमरे हे आपल्या अन्य तीन सहकाऱ्यांसह कारने आष्टीहून गडचिरोलीकडे परतत असताना ही दुर्घटना घडली. जामगिरी गावाजवळ समोरून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा दर्शनी भागाचा चुराडा झाला. गंभीर जखमी अवस्थेत कुमरे यांना तातडीने चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही त्यांची प्राणज्योत मालवली. कारमधील अन्य जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी चामोर्शी पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांनी दिली.

दरम्यान, या घटनेमुळे चामोर्शी आणि गडचिरोली परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून चामोर्शी ते गडचिरोली हा मार्ग मृत्यूचा सापळा ठरत आहे. अवजड वाहनांची अनियंत्रित वाहतूक, वेग मर्यादांचे उल्लंघन आणि रस्त्यांच्या कडेला उभ्या वाहनांमुळे येथे दर काही दिवसांनी मोठे अपघात घडत आहेत. अनेक कुटुंबांनी आपले कर्ते पुरुष या अपघातांत गमावले आहेत.

वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष असून, आणखी किती बळी घेतल्यावर रस्ते सुरक्षेबाबत ठोस पावले उचलली जातील, असा जळजळीत सवाल आता उपस्थित केला जात आहे. कुमरे यांच्या निधनामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात शोककळा पसरली आहे.