गडचिरोली : जिल्हाध्यक्ष निवडीवरून गडचिरोली काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षातून दहा तालुकाध्यक्षांसह शंभरावर पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेत सामूहिक राजीनामे दिल्याने खळबळ उडाली आहे. नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विश्वजित कोवासे यांनी २६ मे रोजी शक्तिप्रदर्शन करत पदग्रहण केले. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशीच काँग्रेसच्या शंभरावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महेंद्र ब्राह्मणवाडे यांना पुन्हा संधी देण्यात यावी, यासाठी मुंबई गाठल्याने काँग्रेसमधील गटबाजी उघड झाली आहे.

कोवासे यांच्या नियुक्तीवरून वाद तीव्र

युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव असलेले विश्वजित कोवासे यांची मागील आठवड्यात जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या समर्थकांनी या नियुक्तीवर आक्षेप घेत ती रद्द करण्याची मागणी केल्याने पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली होती. या पार्श्वभूमीवर कोवासे समर्थकांनी मंगळवारी सायंकाळी पदग्रहण सोहळ्याचे आयोजन करत मोठी रॅली काढली आणि शक्तिप्रदर्शन केले.

वडेट्टीवारांसह वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती

या कार्यक्रमाला काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आमदार विजय वडेट्टीवार, माजी मंत्री वसंत पुरके, काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव अजय चिकारा, महाराष्ट्र प्रभारी कुणाल चौधरी, प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, आमदार अभिजित वंजारी, आमदार रामदास मसराम, माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी नगराध्यक्ष राम मेश्राम यांच्यासह अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची उपस्थितीही लक्षणीय होती. यावेळी आमदार विजय वडेट्टीवार यांनी निष्ठावान आणि संयमी कार्यकर्त्यांना काँग्रेसमध्ये योग्य वेळी संधी मिळते, असे सांगत नव्या नेतृत्वामागे उभे राहण्याचे आवाहन केले.

सपकाळ यांच्याकडे सामूहिक राजीनामे

या शक्तिप्रदर्शनाच्या समांतर मुंबईत घडलेल्या घडामोडींनी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी अधिक तीव्र असल्याचे स्पष्ट केले. जिल्ह्यातील दहा तालुकाध्यक्षांसह जवळपास शंभरावर पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेत सामूहिक राजीनामे सादर केले. प्रदेश स्तरावर निर्णय न झाल्यास दिल्लीला जाण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. त्यामुळे नव्या नियुक्तीभोवती सुरू झालेला वाद केवळ स्थानिक पातळीपुरता मर्यादित नसून, तो थेट प्रदेश नेतृत्वापर्यंत पोहोचला आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसमधील ही उघड दुफळी पक्षासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एका बाजूला नव्या नेतृत्वाला पुढे आणण्याचा प्रयत्न आणि दुसरीकडे नाराज गटाची उघड बंडखोरी, यामुळे गडचिरोली काँग्रेसमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याचे चिन्ह आहेत.