गडचिरोली : जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या ऐवजी विश्वजित कोवासे यांची नियुक्ती करण्यात आल्याने जिल्हा काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर आला आहे. या निर्णयाविरोधात जिल्ह्यातील १२ तालुकाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी संयुक्त पत्रकार परिषद घेत पक्षश्रेष्ठींवर गंभीर आरोप केले. चार दिवसांत जिल्हाध्यक्ष बदलाचा निर्णय मागे घेतला नाही, तर तालुकाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी सामूहिक राजीनाम्याचा निर्णय घेतील, असा थेट इशाराच या वेळी देण्यात आला.

संघटन सृजन अभियानाच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

पत्रकार परिषदेला राजस्थानमधील काँग्रेसचे आमदार तथा पक्ष निरीक्षक मनीष यादव यांच्या दौऱ्याचा संदर्भ देत पदाधिकाऱ्यांनी संघटन सृजन अभियानातील प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित केले. जिल्हाभर बैठका घेऊन सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली होती. त्या प्रक्रियेत तब्बल ९८ टक्के कार्यकर्त्यांनी महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नावाला पसंती दिली होती, असा दावा तालुकाध्यक्षांनी केला. निरीक्षकांनी स्वतः कार्यकर्ते ज्यांना पसंती देतील, त्यांनाच जिल्हाध्यक्ष करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतरही अचानक नेतृत्वबदल करण्यात आला. हा निर्णय संपूर्ण जिल्हा काँग्रेससाठी धक्कादायक आहे, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

ब्राह्मणवाडे यांच्या कार्याची आठवण

महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी भाजपचे वर्चस्व असलेल्या जिल्ह्यात काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने संघर्ष केला. आंदोलन, पदयात्रा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत त्यांनी पक्षात नवचैतन्य निर्माण केले. त्यांच्या कार्यकाळात काँग्रेसला खासदार आणि आमदार निवडून आणण्यात यश मिळाले, याची आठवणही या वेळी करून देण्यात आली. दहा-बारा वर्षांपूर्वी जिल्ह्यात काँग्रेसची अवस्था अत्यंत कमकुवत होती. युवक काँग्रेसपासून सुरुवात करत ब्राह्मणवाडे यांनी पक्ष उभा केला. सामान्य कार्यकर्त्यांना जोडले. मग अशा नेत्याला कोणत्या निकषांवर हटविण्यात आले, असा सवालही उपस्थित करण्यात आला.

ओबीसी विरुद्ध आदिवासी वादाची चर्चा

या नियुक्तीमुळे जिल्ह्यात ओबीसी विरुद्ध आदिवासी असा वाद उभा राहत असल्याची खंत व्यक्त करताना, जिल्हा आदिवासीबहुल असला तरी येथे ६० ते ६५ टक्के लोकसंख्या गैरआदिवासी समाजाची आहे. त्यामुळे संघटनात्मक पदांवर सामाजिक समतोल राखणे आवश्यक होते, असेही पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.

दरम्यान, या संपूर्ण घडामोडींमुळे जिल्हा काँग्रेसमधील नाराजी अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत असून, आगामी काळात पक्षातील अंतर्गत संघर्ष आणखी उफाळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पत्रकार परिषदेला, वसंत राऊत, जीवन नाट, सतीश विधाते, मिलिंद खोब्रागडे, प्रमोद भगत, प्रशांत कोराम, राजेंद्र बुल्ले, मनोज अग्रवाल, रमेश गंपावार, प्रमोद गोटेवार, पप्पू हकीम, सतीश जवाजी, लक्ष्मीकांत बोगामी, शंकरराव सालोडकर, प्रभाकर वासेकर, राजेश ठाकूर, दिलीप घोडाम, नेताजी गावतुरे, नितीन राऊत, अब्दुल पंजवाणी, गिरधर तितराम, कल्पना नंदेश्वर, रुंदाताई गजभिये, कविता उराडे, रीता गोवर्धन, पौर्णिमा भडके, अर्चना मडावी, पुरुषोत्तम बावणे, गणेश कुडमेते, अनिल किरमे, उत्तम ठाकरे, मिलिंद बारसागडे, योगेंद्र झंजाळ आणि श्रीकांत काटवटे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.