गडचिरोली : रविवारी दक्षिण गडचिरोलीला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. रात्रीतून झालेल्या जोरदार पावसाने भल्या पहाटेच भामरागडमध्ये पर्लकोटा नदीला पूर आला. त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. दुकानांत पाणी शिरल्याने लगबगीने ५० कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. नदी-नाले ओसंडून वाहत असून आलापल्ली- भामरागड महामार्ग पाण्याखाली गेला, त्यामुळे भामरागडचा संपर्क तुटला आहे.
जिल्ह्यात रविवारी सर्वत्र पावसाने हजेरी लावली. मात्र, दक्षिण गडचिरोलीत मध्यरात्री पावसाचा जोर वाढला. त्यामुळे भामरागडमध्ये पर्लकोटा नदी तुडुंब भरून वाहिली. पहाटे पूल पाण्याखाली गेला, पाण्याचा दाब वाढून ते थेट बाजारात शिरले. त्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली. अनेकांनी साहित्य तातडीने दुसरीकडे हलविले. प्रशासनाने तत्परता दाखवत डॉ. आंबेडकर वॉर्डातील ५० कुटुंबांना तात्पुरत्या स्वरूपात दुसरीकडे स्थलांतरित केले. मुलचेरा-आष्टी, आलापल्ली-भामरागड, आलापल्ली-सिरोंचा हे मार्ग पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यात सरासरी ४७.२ मि.मी. नोंद झालेली असली तरी एकट्या भामरागड तालुक्यात १७४. ५ मि. मी इतका पाऊस झाला आहे.
हेही वाचा – यवतमाळ : संतप्त महिलांनी अवैध दारू दुकान पेटवले
दुचाकीसह दोघे पुरात वाहून गेले, झाडाच्या फांदीने तारले
भामरागडहून एटापल्ली येथे मोटारसायकलने जात असताना ताडगावजवळ वटेली नाल्यावर अचानकपणे पाण्याचा प्रवाह वाढला. यावेळी पशुधन विकास अधिकारी नितीन विजयकुमार काळे (३०,रा. तोडसा) व बँक अधिकारी तिरुपती शंकर चापले (३०,रा. पंदेवाही) हे दोघे दुचाकीसह वाहून गेले. १०० फूट अंतरावर एक झाडाच्या फांदीला पकडून दोघांनी मदतीसाठी याचना केली. यावेळी नागरिकांनी माणूसकी दाखवत तत्परतेने तरुणांना पाचारण केले. यावेळी आसरा फाउंडेशनचे शंकर हलदार, प्रकाश आत्राम, सुनील मडावी, मनोज महालदार, किंकर मिरदा यांनी त्यांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढले.
हेही वाचा – नागपूरच्या प्रसिद्ध सक्करदरा तलाव परिसर सर्वसामान्यांसाठी असुरक्षित, काय आहेत कारणे?
प्रसूती करणारे दोन डॉक्टर अडकले
भामरागड तालुक्यात एका महिलेला प्रसववेदना सुरू झाल्या. यावेळी रक्तपिशव्यांची गरज होती, पण एकच रक्तपिशवी उपलब्ध झाली. मध्यरात्री सुरक्षित प्रसूती झाली. आता महिलेची प्रकृती स्थिर आहे. या महिलेच्या मदतीसाठी धावलेले दोन डॉक्टर पुरामुळे अडकले आहेत. मात्र, ते सुरक्षित असून प्रशासन त्यांच्या संपर्कात आहे.
कोठे किती पाऊस?
गडचिरोली ४२.८ मि.मी.
धानोरा ४४.६ मि.मी.
देसाईगंज १५.५ मि.मी.
आरमोरी ३२.० मि.मी.
कुरखेडा १५.०१ मि.मी.
कोरची १.७ मि.मी.
चामोर्शी २०.०० मि.मी.
मुलचेरा ४३.०० मि.मी.
अहेरी ६९.०५ मि.मी.
सिरोंचा ४८.०० मि.मी.
एटापल्ली ७९.०२ मि.मी.
भामरागड १७४.५ मि.मी.